

डोर्लेवाडी, ता. २७ : राज्यासह पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या कर वसुलीचे प्रमाण अत्यंत कमी व असमाधानकारक असल्याने ग्रामपंचायतीचा गावगाडा चालविणे जिकरीचे झाले आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांनी वसुली कामी सहकार्य करणे गरजेचे आहे. मात्र, वसुली करणे हे काम केवळ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे आहे, अशी मानसिकता पदाधिकाऱ्यांची झाल्याने ग्रामपंचायतीच्या मूलभूत विकास कामांवर परिणाम होताना दिसत आहे.
राज्य व केंद्र शासनाच्या विविध निधीच्या माध्यमातून गावातील विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे. त्यामळे ग्रामपंचायत पातळीवरील घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कर वसुलीकडे स्थानिक पदाधिकाऱ्यांचे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचे नुकत्याच जिल्हा परिषदेच्यावतीने प्रसिद्ध झालेल्या वसुलीच्या आकडेवारीवरून दिसत आहे.
घरपट्टी, पाणीपट्टीच्या वसूल रकमेतून खऱ्या अर्थाने गावातील पाणीपुरवठा वितरण व दुरुस्ती, गावातील स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य, दिवाबत्ती, साथ रोग नियंत्रण, पूर परिस्थिती नियंत्रण कर्मचारी पगार, कार्यालय व पाणीपुरवठा योजनांची वीजबिले आदी मूलभूत गरजांची कामे केली जातात. मात्र, वसुलीचे प्रमाण नगण्य असल्याने गावातील मूलभूत गरजांची कामे तसेच कर्मचाऱ्यांचे पगार महिनो-महिने होत नसल्याचे विदारक चित्र आहे.
वास्तविक पंचायत राज समितीने घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीच्या मर्यादेबाबत केलेली शिफारस राज्य सरकारने मागेच स्वीकारली आहे. त्या निर्णयानुसार राज्यातील ग्रामपंचायतींना दरवर्षी ७० टक्के करवसुली करावी लागणार आहे. या नियमाचा भंग करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचांना फौजदारी कारवाईस सामोरे जावे लागणार आहे. शिवाय कायद्यातील कलम ३९ नुसार सरपंच व उपसरपंच यांना कर्तव्यात कसूर केल्याने अपात्र ठरविण्याचीही तरतूद आहे. मात्र त्याची अंमलबजावणी झालेली दिसून येत नाही. उलट कर्मचारी यांनाच वसुलीची अट लावून त्यांचे पगार त्यानुसार होत असल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कर्मचारी वर्गामध्ये नाराजी असून, ही वसुलीची अट रद्द करावी, अशी मागणी कर्मचारी युनियनने राज्यशासनाकडे वारंवार निवेदनाद्वारे केली आहे.
जनतेने आपल्याला निवडून दिलेले आहे. त्यामुळे त्यांच्या मूलभूत गरजा भागविणे हे पदाधिकाऱ्यांचे कर्तव्यच आहे. मात्र गावचा विकास करायचा असेल, तर त्याला आर्थिक पाठबळ गरजेचेच आहे. घरपट्टी पाणीपट्टी वसुली झाली, तर मोठ्या प्रमाणात विकास करता येतो. आम्ही गावचा विकासही केला आणि वेळप्रसंगी थकबाकीदारांचे नळ कनेक्शनही बंद केले. आमची मुदत संपल्यानंतर तब्बल ११ लाख रुपये ग्रामपंचायतीच्या खात्यामध्ये शिल्लक होते.
-कल्याणी कळकुटे, माजी सरपंच, डोर्लेवाडी.
दरवर्षी आपण गावातील सण, उत्सव, यात्रा उत्साहात साजरे करतो. त्यासाठी नियमित देणगी, वर्गणी जमा करतो. त्याच पद्धतीने नागरिकांना ग्रामपंचायतीच्या पातळीवर वीज, पाणी, स्वच्छता आदी सर्व मूलभूत सोई-सुविधा मिळवायच्या असतील, तर सर्वांनी नियमित व वेळेत कर भरणे गरजेचे आहे.
- डॉ. अनिल बागल, गटविकास अधिकारी, बारामती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.