निरावागज- डोर्लेवाडीत राष्ट्रवादीचा विक्रमी विजय
डोर्लेवाडी, ता. १३ : बारामती तालुक्यातील निरावागज- डोर्लेवाडी गट व गणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तीनही उमेदवारांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला.
निरावागज गटात अनुसूचित जाती संवर्गासाठी आरक्षण आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीतील दहाहून अधिक निष्ठावान कार्यकर्त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. त्यामध्ये शेवटच्या दिवसापर्यंत यामधील एका उच्चशिक्षित उमेदवाराची उमेदवारी निश्चित केली होती. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी अनेक राजकीय घडामोडी घडल्या. त्यामध्ये अजित पवार यांनी भाजपतील दिग्गज कार्यकर्ते व जेजुरी येथील खंडोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त अभिजित देवकाते यांचा पक्षप्रवेश करून त्यांच्या पत्नी शिवानी देवकाते यांना उमेदवारी दिली. त्यानंतर या गटात बराच नाराजीचा सुरू उमटला होता. मात्र, अजित पवार यांनी स्वतः उमेदवारी दिल्यामुळे व या भागातील विरोध संपवल्यामुळे नंतर सर्वांनी एकजुटीने घरोघरी जाऊन प्रचार यंत्रणा राबवली. अभिजित देवकाते यांचे या गटात पूर्वीपासूनच मोठे सामाजिक कार्य असल्याने त्याचाही फायदा त्यांना या निवडणुकीत झाल्याचे मानले जात आहे. शिवाय अजित पवार यांच्या निधनामुळे मिळालेल्या सहानुभूतीचाही मोठ्या प्रमाणात फायदा झाल्याचे निकालावरून दिसून आले. शिवानी अभिजित देवकाते यांना तब्बल २२ हजार ६१३ एवढी विक्रमी मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी वंचित आघाडीचे उमेदवार रोहित भोसले यांना अवघ्या १ हजार ६९ मतांवर समाधान मानावे लागले.
दुसरीकडे निरावागज गणात राष्ट्रवादीचे निष्ठावान असलेले सर्वसामान्य कुटुंबातील तरुण कार्यकर्ते नितीन अरुण काकडे यांना त्यांच्या कार्यालयीन कामाची दखल घेऊन पक्षाच्या वतीने उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनाही या गणात विक्रमी १० हजार ९८५ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार राज कांबळे यांना ४९५, तर काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र गायकवाड यांना ४६९ मतांवर समाधान मानावे लागले.
डोर्लेवाडी गणात राष्ट्रवादीच्या राजश्री भूषण टकले व प्रतिस्पर्धी एकमेव अपक्ष उमेदवार कल्याणी सुजितकुमार वाघमोडे यांच्यामध्ये चुरस होईल, असे मानले जात होते. मात्र, येथेही गणातील सर्व मतदारांनी अजित पवार यांनी दिलेल्या उमेदवारावर विश्वास ठेवून भरघोस १० हजार ८१३ मतांनी राजश्री टकले यांना निवडून दिले. तर, प्रतिस्पर्धी उमेदवार कल्याणी वाघमोडे यांना १ हजार मतांचा टप्पाही गाठता आला नाही. त्यांना केवळ ८७७ मते मिळाली.
निकाल अजितदादांना समर्पित
निरावागज- डोर्लेवाडी गट व गणात अजित पवार यांनी कोट्यवधी रुपयाची विकास कामे केल्याने त्यांना मतदारांनी मतांच्या रूपाने श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला. निवडणूक निकालानंतर या तीनही उमेदवारांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. त्यांनी विजय आपले दिवंगत नेते अजित पवार यांना समर्पित केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

