झारगडवाडीतील रस्ता निकृष्ट ठेकेदार ''ब्लॅक लिस्ट''मध्ये
डोर्लेवाडी, ता. १५ : झारगडवाडी (ता. बारामती) येथील अंतर्गत रस्त्याचे काम निकृष्ट केल्याप्रकरणी ठेकेदार अमर संजय जाधव यांना पुणे जिल्हा परिषद प्रशासनाने एक वर्षासाठी काळ्या यादीत टाकले आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी हे आदेश दिले.
झारगडवाडी येथे २०२२-२३ मध्ये नागरी सुविधा योजनेतून १५ लाख रुपयांच्या रस्ते कामाला मंजुरी मिळाली होती. ठेकेदार जाधव यांनी २२ सप्टेंबरला काम पूर्ण झाल्याचे दाखवून देयक स्वीकारले. मात्र, काही दिवसांतच रस्ता खराब झाल्याने निकृष्ट दर्जा उघड झाला. सामाजिक कार्यकर्ते युवराज पोटे यांनी याप्रकरणी ग्रामपंचायत व पंचायत समितीकडे लेखी तक्रार केली होती.
वारंवार सूचना आणि दोन स्मरणपत्रे देऊनही ठेकेदाराने दुरुस्ती केली नाही. बांधकाम उपविभागाच्या प्रत्यक्ष पाहणीत कामाचा दर्जा खराब असल्याचे सिद्ध झाले. उपअभियंत्यांच्या शिफारशीनुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमावलीनुसार जाधव यांना जिल्हा परिषदेच्या निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यास एक वर्षासाठी प्रतिबंध करण्यात आला आहे.
पाठपुरावा सुरूच राहणार
नफ्यासाठी निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांविरुद्ध सातत्याने पाठपुरावा केल्याने ही कारवाई झाली. जोपर्यंत रस्ता दुरुस्तीचे सर्व निकष पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत लढा सुरूच राहील, असे सामाजिक कार्यकर्ते युवराज पोटे यांनी सांगितले.

