वैश्विक तुकोबाराय

वैश्विक तुकोबाराय

Published on

वैश्विक तुकोबाराय

जगद्‍गुरू संत तुकाराम यांच्या अभंगांनी जगभरातील साहित्यिक, लेखक आणि कवींना प्रेरणा दिली आहे. जीवन जगण्याचा मार्ग, ईश्वरभक्ती आणि मानवता हे विचार अत्यंत साध्या, पण तितक्याच प्रभावी शब्दांत तुकाराम महाराजांनी मांडले. हे काव्य अभंगांच्या रुपाने जगासमोर आले. वैश्विक असल्यानेच हे विचार सातासमुद्रापार पोहोचले. त्यांच्या जन्मदिनानिमित्त....
- प्रशांत महाराज मोरे देहूकर, वंशज, संत तुकाराम महाराज
-------------------
दे हूच्या मातीत जन्मलेले जगद्‍गुरू तुकोबारायांचे वैश्विक विचार इंद्रायणीच्या नितळ आणि निर्मळ पाण्याप्रमाणे देश, प्रांत, भाषेच्या मर्यादा ओलांडून आता दुथडी भरून प्रवाहित होत आहेत. अणु-रेणूहून थोकड्या असणाऱ्या तुकोबारायांनी अवघ्या विश्वाच्या आकाशाला गवसणी घातली आहे.
‘इटली’ देशातील ‘व्हेनिस’ येथे १९३७ मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘संत तुकाराम’ या चित्रपटाने जगातील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्राप्त केला होता. परदेशी गायकांनादेखील तुकोबारायांच्या अभंगांची भुरळ पडली आहे. त्यांच्याकडून विविध अभंग गायले जातात आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नृत्यांगना या अभंगांवर नृत्यही सादर करतात.
‘अलेक्झांडर ग्रँट’ यांनी १८६९ मध्ये सर्व प्रथम तुकोबारायांची गाथा प्रकाशित केली होती. अनेक परदेशी साहित्यिकांसाठी आणि समाज सुधारकांसाठी तुकाराम महाराजांचे अभंग प्रेरणास्रोत आहेत. अमेरिकेतील नाला विल्किन्सन आणि त्यांच्या पत्नी ‘न्यूयार्क’मधील शांतिमंदिरात तुकोबारायांच्या अभंगांचे निरूपण करत आहेत. तेथील श्रोत्यांनी त्यांचे आता प्रेमाने ‘तुकाराम’ आणि ‘आवली’ म्हणून नामकरण केले आहे.
जगातील इंग्रजी, फ्रेंच, जपानी, स्पॅनिश, जर्मन, रशियन अशा विविध भाषेमध्ये तुकोबारायांचे अभंग अनुवादित केले गेले आहेत. विदेशी साहित्यिक ‘जॉन विल्सन’ यांच्या मते तुकोबाराय सर्वांत लोकप्रिय जागतिक कवी आहेत. त्यांनी त्यांच्या साहित्यात तुकोबारायांच्या
सर्व सुखाचिया आशा जन्म गेला ।
क्षण मुक्ती यत्न नाही केला ।।
या अभंगाचा समावेश केला आहे. ‘जस्टीन ई. ॲबट’ यांनी ‘लाईफ ऑफ तुकाराम’ या पुस्तकाचे लेखन आणि संतकवी महिपतीलिखित ‘संत तुकाराम’ चरित्राचे १९२९ मध्ये इंग्रजीत भाषांतर केले आहे. ‘‘अद्वैतवाद हे हिंदू तत्त्वज्ञान तुकाराम महाराजांच्या अध्यात्माचा पाया आहे,’’ असे त्यांचे स्पष्ट मत आहे. जे. एफ. एडवर्ड आणि जे. नेल्सन फ्रेझर यांनी ‘दि लाइफ ॲन्ड टीचिंग ऑफ तुकाराम’ हे तुकोबारायांच्या जीवनावर पुस्तक लिहिले आहे. एडवर्ड यांच्या मते, ‘‘व्यक्तिगत धार्मिक जीवनाचे तुकाराम महाराजांपेक्षा अधिक चांगले जीवन हिंदू धर्मात असूच शकत नाही. विलबर डेमिंग यांनी ‘‘तुकोबाराय हे भक्ती मार्गाचे सर्वश्रेष्ठ प्रवक्ते आणि निरामय धार्मिक जीवनाचे प्रेरणास्रोत आहेत’’ असे ‘सिलिक्शन्स फ्रॉम तुकाराम’ या पुस्तकात नमूद केले आहे. फ्रेंच साहित्यातील लेखक डॉ. गॉय अल्बर्ट दलरी यांनी त्यांच्या ‘दी कल्ट ऑफ विठोबा’ या ग्रंथात ‘‘संत तुकाराम महाराजांमुळे क्षेत्र पंढरपूरला तीर्थयात्रेचे व संस्कृतीचे महान केंद्र असे महत्त्व पुन्हा प्राप्त झाले,’’ असे भाष्य केले आहे. दलरी यांनी तुकोबारायांच्या १०१ अभंगांचे फ्रेंच भाषेत भाषांतर केले होते आणि या अभंगांचे फ्रान्सच्या रेडिओवरही प्रसारण झाले होते.
जर्मन साहित्यिक लोथार लुत्से यांनी तुकोबांच्या अभंगांचा जर्मन भाषेत भावानुवाद केला आहे. एल्सा क्रॉस या प्रसिद्ध लेखिकेने देखील तुकोबारायांच्या अभंगांचा स्पॅनिश भाषेत अनुवाद केला आहे. डॉ. निकोल मॅकॅनिकल यांनी १९१९ मध्ये ‘साम्स ऑफ मराठा सेंट्स’ या ग्रंथात तुकाराम महाराजांच्या ७६ अभंगांचा इंग्रजीत अनुवाद केला आहे. जपानच्या अभ्यासक युरिको इकनोया यांनी तुकोबारायांचे अभंग जपानी भाषेत अनुवादित केले आहे. १८५५ मध्ये ख्रिश्चन धर्मोपदेशक मिचेल मरे यांनी ‘तुकारामाची गोष्ट’ हा ग्रंथ लिहिला आहे. अमेरिकेन लेखिका, समाजशास्त्रज्ञ ‘डॉ. गेल ऑम्वेट’ यांनी ‘दी साँग्स ऑफ तुकोबा’ हे पुस्तक लिहिले आहे. हॉलंडमधील धर्माधिकाऱ्यांनी एका धर्मग्रंथात
‘‘जेथे जातो तू माझा सांगाती ।
चालविसी हाती धरूनिया ।।’’
या तुकोबारायांच्या अभंगाचा समावेश करून, ‘‘देवाबद्दलचा आनंद आणि प्रेम व्यक्त करणारे एक उदात्त काव्य’’ असे वर्णन केले आहे. तसेच तुकोबारायांच्या उत्कट भक्तीचा कौतुकाने त्या धर्मग्रंथात उल्लेख करण्यात आला आहे.
अनेक विदेशी लेखकांनी, अभ्यासकांनी तुकोबारायांच्या अद्वैत तत्वज्ञानाचे, अभंगांचे, भाषा सौंदर्याचे, भक्तीची आर्तता अशा विविध गुणांचे मनोसोक्त कौतुक केले आहे. संत तुकाराम महाराजांना परदेशी साहित्यिकांनी जगाच्या व्यासपीठावर नेण्याचे महान कार्य निश्चित केले आहे. त्यामुळे वैश्विक तुकोबारायांचे ‘जगद्‍गुरू’ हे परमपद सार्थ ठरते.

PNE26V88797

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com