भीमा पात्रात बुडीत साखळी बंधारे उभारा
देऊळगाव राजे, ता. ९ : दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील भीमा नदीचे पात्र उन्हाळ्यामध्ये कोरडे पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देत नाही. यंदा उजनी धरण पूर्ण भरूनही पाणीटंचाई होत आहे. टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्यासाठी नदीपात्रात ठिकठिकाणी बुडीत साखळी बंधारे बांधण्याची मागणी दौंड व अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे. लोकप्रतिनिधींनी आश्वासने देऊनही अघापही बंधाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावला नाही, यामुळे शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे.
सध्या नदीपात्र कोरडे पडल्यामुळे दौंडसह शेजारील श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील पिके करपू लागली आहेत. भामा आसखेड धरणातून सोडलेले पाणीही या भागातील बंधारे शेवट असल्याने पोहचण्यास विलंब होत आहे. कधीकधी सोडलेले पाणी राजेगाव पर्यंतही पोहचत नाही. अशा दुहेरी कात्रीत या भागातील हक्काचा लाभधारक शेतकरी सापडला आहे.
शेतकऱ्यांना पाणी वेळेत उपलब्ध होत नसल्याने विविध अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच गावच्या पाणीपुरवठा योजनाही बंद राहून जनावरांना पाण्यासाठी भटकावे लागते.
पेडगाव ( ता.दौड) येथे शासनाने विशेषबाब म्हणून भीमा नदीत्रात बुडीत बंधारा बांधला आहे. यामुळे याच धर्तीवर वडगाव दरेकर, सिध्दटेक पूल, मलठण वाटलूज शिव, राजेगाव व खानवटे गावच्या हद्दीत भीमा नदीपात्रात बंधारे बांधण्याची मागणी सातत्याने होत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
भीमा नदी पात्रात राजेगावसह ठिकठिकाणी पेडगावच्या धर्तीवर बुडीत बंधारे बांधणे गरजेचे आहे. पंरतु अद्याप तो सुटलेला नाही. यामुळे हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ लवकरच उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहे.
- सागर विलास जाधव, प्रगतशील शेतकरी, राजेगाव, ता.दौंड
एकत्रित पाठपुराव्याची मागणी
गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करूनही बुडीत बंधाऱ्याचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. यासाठी दौंडचे आमदार राहुल कुल, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार, श्रीगोंदाचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी एकत्र येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी तीन तालुक्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
पेडगाव (ता.दौंड) येथील बुडीत बंधाऱ्याची नदीपात्रातील उंची वाढवून बंधाऱ्याला यांत्रिकी तथा स्वंयमचलित दरवाजे बसविल्यास पाण्याचा फुगारा खोरवडी बंधाऱ्यापर्यंत जाईल.
यामुळे वडगाव दरेकर, देऊळगाव राजे, आर्वी अनगर, अजनूज, पेडगाव, जलालपूर या गावांचा उन्हाळ्यात होणारा पाणीप्रश्न मिटणार आहे. यामुळे उंची वाढविणे गरजेचे आहे.
-गणेश झिटे, प्रगतशील शेतकरी पेडगाव, ता.श्रीगोंदा
00415
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

