दौंड तालुका कार्यालयातील शिरस्तेदाराची दंबगगिरी
देऊळगाव राजे, ता. २३ : दौंड तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयात अहवालाची माहिती घेण्यासाठी गेलेल्या गावच्या लोकप्रतिनिधीला माहिती न देता येथील शिरस्तेदारांनी अरेरावीची भाषा वापरून बाहेर जाण्यास सांगितले. यामुळे संतापाची लाट निर्माण झाली आहे. लोकप्रतिनिधींवर दंबगगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
याबाबत माहिती अशी की, दौंड येथील कार्यालयात २० जून रोजी राजेगाव (ता. दौंड) ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य रमेश जाधव हे गेले होते. यावेळी हा प्रकार घडला. येथील गावडे बगाडेवाडी ही ९०० लोकसंख्या असणारे महसुली उत्पन्नाची लोकवस्ती राजेगाव गावांतर्गत आहे. येथील १९८६ मध्ये भूमी अभिलेख यांच्याकडून सिटी सर्वे झालेला आहे. तेव्हापासून ग्रामस्थांना आपल्या जागेचे प्रॉपर्टी कार्ड मिळत होते. यानंतर संगणकीय प्रणालीमध्ये इपीसीआय एसवर ही वाडी दौंड भूमी अभिलेख कार्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे घेण्यात आलेली नव्हती. त्यामुळे वारस नोंदी प्रॉपर्टी कार्ड उतारे गेल्या चार वर्षापासून ग्रामस्थांना मिळत नाहीत. त्याचा पाठपुरावा म्हणून ग्रामपंचायत सदस्य जाधव यांनी जिल्हा अधीक्षक पुणे यांना १९ आक्टोबर २०२१ रोजी निवेदन दिले होते.
त्या अनुषंगाने जिल्हा अधीक्षक यांनी दौंड कार्यालयाला आक्टोबर २०२४ रोजी पत्र काढून कार्यालयास तत्काळ अहवाल सादर करण्यास सांगितले होते. हा अहवाल सादर करण्यास एवढा विलंब कशामुळे झाला याविषयी दौंडचे उपअधीक्षक यांच्याकडून जाधव हे शुक्रवारी दुपारी माहिती घेत होते. यावेळी कार्यालयातील शिरस्तेदार तेथे येऊन मध्येच अरेरावीची भाषा वापरून त्यांना बाहेर जाण्यास सांगितले.
याबद्दल जाधव यांनी उपअधीक्षक यांच्याकडे नाराजी व्यक्त करून कार्यालयात उर्मटपणा करणाऱ्या शिरस्तेदारावर कारवाईची मागणी केली. दरम्यान दौंड भूमी अभिलेख कार्यालयाने सहा महिने होऊनही अहवाल दिलेला नाही. यामुळे पुढील आठ दिवसांत अहवाल न पाठवल्यास व शिरस्तेदारावर कारवाई न केल्यास भूमी अभिलेख कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे जाधव यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. याबाबत दौंड भूमी अभिलेखचे उपअधिक्षक धनराज शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता तो झाला नाही.
दौंड भूमी अभिलेख कार्यालयातील शिरस्तेदार नागरिक व लोकप्रतिनिधींची उर्मटपणे व बेजबाबदारपणे वागत आहे. यामुळे त्यांच्यावर खात्याअंतर्गत कारवाई होण्यासाठी आपण वरिष्ठ कार्यालयाकडे लेखी तक्रार दाखल करणार आहे.
- रमेश जाधव, ग्रामपंचायत सदस्य.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.