ग्राम सुरक्षा यंत्रणेमुळे फसला काळेवाडीत चोरीचा प्रयत्न
देऊळगाव राजे, ता. १४ : काळेवाडी (ता. दौंड) येथे मंगळवारी (ता. १३) मध्यरात्री दीड वाजता वाल्मीक गायकवाड यांच्या घरी दोन ते तीन चोरट्यांनी घरफोडीचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी सामाजिक कार्यकर्ते किसन गायकवाड यांना कळवले, त्यांनी तत्काळ ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे सर्व गावाला ही माहिती कळवली. त्यामुळे गावकरी घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण गाव सतर्क झाल्याचे लक्षात येताच चोर अंधाराचा गैरफायदा घेऊन पळून गेले. ग्रामस्थांच्या एकीमुळे पुढील अनर्थ टळला.
काळेवाडीत ग्रामसुरक्षा यंत्रणेचा विविध सूचना देण्यासाठी ७३ वेळा वापर करण्यात आला आहे. ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तत्काळ व प्रभावी वापरामुळे घरफोडीचा प्रयत्न फसला आहे, अशी माहिती पोलिस पाटील राधिका पहाणे यांनी दिली.
संकटकाळात आपत्तीग्रस्त नागरिकाने ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरूपात तत्काळ ऐकवला जातो. त्यामुळे गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होत आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलाचा उपक्रम असणाऱ्या ग्राम सुरक्षा यंत्रणेत जिल्ह्यातील १९९६ गावे सहभागी आहेत. जिल्ह्यातील ११ लाख २२ हजार नागरिक यंत्रणेत सहभागी आहेत. आजवर जिल्ह्यात ३४ हजार ५९२ वेळा यशस्वी वापर केला आहे.
ग्राम सुरक्षा यंत्रणेमुळे चोरी रोखण्यात यश आले, परंतु ऐन सणासुदीच्या काळात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षी याच काळात चौदा तोळे सोन्याची चोरी झाली होती. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे. संशयास्पद काही वाटले तर लगेच संपर्क साधावा.
- राधिका पाहणे,
पोलिस पाटील, काळेवाडी (ता. दौंड)

