

आंबेगावातील पर्यटनाचा नादच खुळा
आंबेगाव तालुक्यात पर्यटन म्हटले की आठवण येते ती क्षेत्र भीमाशंकर परिसरातील अभयारण्य, आहुपे व पाटण खोऱ्यातील पावसाळा व हिवाळा या ऋतुतील निसर्ग सौंदर्याचा आविष्कार.
निसर्गाने भरभरून दिलेली देणगी म्हणजे ओसंडून वाहणारे पावसाळ्यातील धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात. शेकडो वर्षापासून स्थायिक आदिवासींनी राखून ठेवलेली देवराई व कोकणकडे पर्यटकांना भुरळ घालतात. पावसाळी पर्यटनाचा तर नादच खुळा. उन्हाळी पर्यटनासाठीही हा भाग पर्यटकांना भुरळ घालत आहे.
- चंद्रकांत घोडेकर
भीमाशंकर अभयारण्य महाराष्ट्र राज्यातील पुणे, ठाणे, रायगड या जिल्ह्याच्या सीमेवर हे अभयारण्य आहे. महाराष्ट्राच्या मानचिन्हांपैकी एक असलेल्या शेकरू या सस्तन प्राण्याचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते. येथे गवळी धनगर समाज तर डोंगर उतारांवर आदिवासी महादेव कोळी समाज राहतो. महाराष्ट्राच्या वन्यजीव विभागात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पश्चिम घाटातील परिसरात भीमाशंकर अभयारण्याचा समावेश करण्यात आला आहे. या अभयारण्याचे संपूर्ण क्षेत्र १३ हजार ७८ हेक्टर इतके आहे. येथे वन्यजीव विभागाची स्थापना १९८५ मध्ये करण्यात आली व हे अभयारण्य संरक्षित करण्यात आले. भीमाशंकरचे अभयारण्य सुमारे तीन हजार फूट उंच कड्यांनी दोन भागांत विभागले गेले आहे.
गिरिभ्रमण आणि पदभ्रमणासाठी परिसर प्रसिद्ध
भीमाशंकर अभयारण्य क्रमांक एकमध्ये श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर आणि परिसरातील जंगलाचा भाग समाविष्ट होतो, तर भीमाशंकर अभयारण्य क्रमांक दोनमध्ये ठाणे, रायगड, जिल्ह्यातील जंगलाचा समावेश आहे. धसई, नारोली, म्हसा ही या जंगल परिसरातील प्रमुख गावे आहेत. हा परिसर गिरिभ्रमण आणि पदभ्रमण यासाठीही प्रसिद्ध आहे. विशेषतः पावसाळ्यात या परिसरात पदभ्रमण करण्यासाठी लोक येत असतात.
उन्हाळी पर्यटनाची पर्यटकांना भुरळ
आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भाग पर्यटकांना भूरळ घालत आहे. एका बाजूला प्रसिद्ध क्षेत्र भीमाशंकर मंदिर तर दुसऱ्या बाजूला निसर्गाचा अमूल्य ठेवा लाभलेले आहुपे हे गाव. शेकडो
वर्षापासून स्थानिकांनी राखून ठेवलेली येथील देवराई व कोकणकडे पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत आहेत. पावसाळी पर्यटनासाठी तर येथील नादच खुळा. उन्हाळी पर्यटनासाठीही हा भाग पर्यटकांना भुरळ घालत आहे.
डोंगरावरून खळखळणारे धबधबे
आहुपे व भीमाशंकर हा सर्व भाग सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा प्रदेश असल्याने पावसाळा हिवाळा व या तीनही ऋतूत येथे निसर्गाची बदलणारी विविध रूपे पावस मिळतात. आंबेगाव तालुक्याचे
शेवटचे टोक आहुपे हे गाव तर निसर्ग सौंदर्याचा वारसा लाभलेले गाव आहे. पावसाळा सुरू होताच दाटधुक्याबरोबरच डोंगरावरून खळखळणारे धबधबे, हिवाळ्यातील गर्द हिरवाई आणि तर ऐन उन्हाळ्यातही येथील वनराईत लालजर्द, पिवळ्याधमक अशा रंगीबेरंगी फुलांनी भरलेला निसर्ग सौंदर्य मानवालाच काय जंगलातील पशुपक्षांनाही भुरळ घालत असतो.
निसर्गसौंदयाचे भरभरून वरदान मिळालेले गाव अशी या गावची ओळख आहे . उंचच्या उंच कडे, पक्षांचा किलबिलाट, घोंगवणारे वारे, महाराष्ट्राचे मानचिन्ह शेकरू, ससे, साळींदर, वानर, हरणे इत्यादी वन्य प्राणी येथे जणूकाही एकाच आईची लेकरे होऊन पिढ्यान पिढ्या वावरत असल्याचे पहावयास मिळते. निसर्गाच्या प्रकोपामुळे जगाच्या नकाशावर कोरले गेलेले माळीण हे गावही याच मार्गावर आहे. आहुपे हे गाव पर्यटनाच्या दृष्टीने कात टाकू लागले आहे. स्थानिक ग्रामस्थ वनविभागाच्या सहकार्याने एक एक पाऊल पुढे येत आहेत. पर्यटकांच्या मागणीनुसार येथे अल्प दरात चहा जेवण व राहण्याची सोय ग्रामस्थामार्फत करण्यात येते. निसर्ग सौंदर्याचा मनमुरात आनंद घ्यावयाचा असेल तर आपल्याला जावे लागते आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागाचे प्रवेशद्वार समजले जाणाऱ्या डिंभे या गावी.
पुढे निघाल्यावर डाव्या बाजूचा रस्ता जातो भीमाशंकरकडे तर
उजव्या बाजूला रस्ता जातो डिंभे धरणाला वळसा घालीत फुलवडे, बोरघर, अडीवरे, माळीन पासून या दुर्गम भागातील खेड्यांकडे. येथून पुढे येणारे आहुपे हे गाव पुणे, ठाणे, रायगड जिल्ह्याचे सीमेवर समुद्रसपाटीपासून सुमारे ३५०० फूट उंचीवर वसले आहे.
आहुपे हे गाव पुण्यापासून उत्तरेला साधारणतः दिडशे ते दोनशे किलोमीटवर असून पुण्यातील नवीन बसस्टॉप वाकडेवाडी येथून पुणे-भीमाशंकर एस.टीने डिंभे गावापर्यंत येता येते. तेथून खासगी
वहानाने आहुपेकडे जाता येते. राजगुरुनगर आगाराच्या सकाळी नऊ दुपारी तीन वाजता बसच्या फेऱ्या आहेत. मात्र या बस वर अवलंबून न रहाता आपला प्रवास सुखकर व्हावा म्हणून खासगी वाहनानेच येथे येत असतात.
पोखरी घाट हा महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील एक पर्वतीय प्रदेश आहे. निसर्गरम्य वैभव, हिरवेगार टेकड्या, खळखळणारे धबधबे, डिंभे धरण आणि गोहे पाझर तलावाचे घाटातून दिसणारे
नयनरम्य दृश्य या मुळे श्रीक्षेत्र भीमाशंकर कडे जाणारे भाविक आणि पर्यटक या घाटात आवर्जून थांबून येथील निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद घेत असल्याचे पाहावयास मिळते. अलीकडे तर पोखरी घाट हे पर्यटकांचे आकर्षण बनू लागले आहे. घाटातील पहिल्याच वळणावर खळखळून वाहणारा धबधबा हे या मार्गावरील पर्यटकांचे आकर्षण आहे. येथे थांबून असंख्य पर्यटक पाण्यात भिजण्याचा आनंद घेत असल्याचे पहावयास मिळते. पावसाळा सुरू झाल्यापासून या धबधब्यावरील गर्दी अद्याप कमी झालेले नाही.
निसर्गरम्य सौंदर्य :
पोखरी घाट हे निसर्गसौंदर्याचे आश्रयस्थान आहे, जे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या भाविक आणि पर्यटकांना आश्चर्यचकित करतात. हिरव्यागार टेकड्या, घनदाट जंगल, धबधबे आणि धुक्याने भरलेल्या दऱ्यांमुळे हा घाट नेहमीच शांत आणि नयनरम्य वातावरण देतो. श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारपासून या घाटाचे निसर्ग सौंदर्य अधिकच भरले असून घाटातील सागाच्या झाडांना आलेली फुले आणि रस्त्याच्या कडेने फुललेली टणटणी आणि तेरड्याच्या लालचंद फुलांनी सध्या घाटातील सौंदर्यात भर पडली आहे.
मॉन्सूनचा आनंद:
पोखरी घाट पावसाळ्यात जिवंत होतो, पावसाळ्यात या भागात जोरदार पाऊस पडतो. घाटाचे रूपांतर हिरवळीच्या नंदनवनात होते, हिरवाईने सुशोभित केलेले डोंगर, वाहणारे असंख्य धबधबे. आणि पायथ्याशी तुडुंब भरलेला गोहे पाझर तलाव, येथील आदिवासींची घरे व भात शेती थंड हवामान आणि धुके असलेले वातावरण यामुळे संपूर्ण पश्चिम घाटातील पावसाळ्याची जादू
पाहणाऱ्यांसाठी पोखरी घाट हे एक अप्रतिम स्थान बनले आहे.
जैवविविधता हॉटस्पॉट
पोखरी घाट व भीमाशंकरचे अभयारण्य हे एक जागतिक वारसा स्थळ आणि जैवविविधता हॉटस्पॉट बनू पाहत आहे. विविध वनस्पतीच्या प्रजाती, पक्षी, प्राणी आणि
कीटक यांचा समावेश असलेल्या समृद्ध वनस्पती आणि जीवजंतूंद्वारे घाटाचे पर्यावरणीय महत्त्व स्पष्ट होते. गेल्या काही वर्षांपासून या घाटात बाराही महिने मोरांचे दर्शन घडू लागले आहे. यामुळे
निसर्गप्रेमी, वन्यजीव प्रेमी आणि संशोधक भीमाशंकर अभयारण्य आणि पोखरी घाटातील जैवविविधतेचे अन्वेषण करण्यासाठी खेचले जाणार नाही तरच नवल.
जैवविविधता
भीमाशंकर अभयारण्य हे ‘डेसिडियस फॉरेस्ट’ या वनाच्या प्रकारात गणले जाते. अभयारण्य परिसरात दरवर्षी सुमारे सात हजार मिलिमीटर पाऊस पडतो. येथील जंगलात आंबा, जांभूळ, उंबर,
अंजन, शेंद्री, पिसा, ऐन, साग, मोह, बांबू, हिरडा, करवंदे आणि आईन अशा वैविध्यपूर्ण वनस्पती आणि अनेक दुर्मीळ औषधी वनस्पती आहेत. तसेच बिबट्या, वाघ, सांबर, हरिण, कोल्हा, साळिंदर, भेकर, लांडगा, वानर, तरस, काळवीट, मोर असे अनेक प्रकारचे वन्यजीवदेखील भीमाशंकरच्या अभयारण्यात पाहायला मिळतात.
गुप्त भीमाशंकर
भीमानदीचे मूळ उगम ज्योतिर्लिंगात आहे. परंतु ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे १.५ किलोमीटर पूर्वेला पुन्हा प्रकटते असे मानले जाते. ही जागा गुप्त भीमाशंकर
म्हणून ओळखली जाते.
कोकण कडा
भीमाशंकर मंदिराजवळच पश्चिमेला हा कडा असून, त्याची उंची साधारणपणे ११०० मीटर इतकी आहे. येथून अतिशय विहंगम असे दृश्य दिसते. अतिशय स्वच्छ वातावरणात पश्चिमेकडचा
अरबीसमुद्रही दिसू शकतो.
सीतारामबाबा आश्रम
कोकणकड्यापासून एक रस्ता या आश्रमाकडे जातो. घनदाट जंगलात हे ठिकाण आहे. गाडीने या ठिकाणी पोचता येते.
नागफणी
आश्रमापासून नागफणीला जायला पायवाट आहे. हे ठिकाण अभयारण्यातील सर्वात उंच ठिकाण असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून १२३० मीटर इतकी आहे. कोकण व परिसराचे अतिशय
विहंगम दृश्य दिसते. कोकणातून हे शिखर नागाच्या फण्याप्रमाणे दिसते म्हणून नागफणी असे नाव पडले आहे.
येथे पर्यटनाला येताना हे करा
१. स्थानिक ग्रामस्थांशी प्रेमळपणे वागा, अडचणीच्या काळात तेच आपल्या मदतीला धावून येतात.
२. आपल्या गाडीची स्पीड एकदम कमी ठेवा,
३. गाडीच्या टाकीत इंधन फूल करा.
४. प्रवासात लांबपर्यंत नाश्त्याची कोणतीच व्यवस्था नसल्याने बरोबर खाद्य पदार्थ ठेवा.
५. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाणी भरपूर बरोबर ठेवा.
हे करू नका....
१. हा भाग इको सेन्सिटिव्ह झोन असल्याने मोठ्याने गाडीचे हॉल वाजवू नका, येथे मद्यपान करण्यास सक्त मनाई आहे.
२. गाडीचे हॉर्न, मोठ्या आवाजात गाणी वाजवू नका.
३. निसर्ग सौंदर्याच्या मोहात खोलपर्यंत जंगलात जाऊ नका,
४. अतिउंच कड्यांच्या टोकापर्यंत जाऊ नका
५. स्थानिक ग्रामस्थ आणि आणि वन्य पशू पक्षांना कोणताही त्रास होऊ नये असे कृत्य करू नका.
............................................
पंचतारांकित हॉटेल व राहण्यासाठी उत्तम सुविधा गरजेच्या
आंबेगाव तालुक्यातील पश्चिम विभागांमध्ये पर्यटनाला मोठी संधी आहे. या ठिकाणी दळणवळणाच्या सुविधा पंचतारांकित हॉटेल व राहण्यासाठी उत्तम सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. श्री क्षेत्र भीमाशंकर व येथील फॉरेस्टमध्ये पर्यटकांना फिरण्यासाठी सूर्याच्या ऊर्जेवर चालणाऱ्या मोटर गाडीची गरज आहे. या ठिकाणी शेकरू या प्राण्यामुळे येथे नागरिकांवर अनेक बंधने लादली आहेत.
पर्यटनासाठी आदिवासी नागरिकांचा उपयोग करून घेऊन त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्याची सुद्धा गरज आहे. घनदाट जंगल व वाहणारी धबधबे येथे पर्यटन करणाऱ्या लोकांसाठी दिशा दाखवणारा येथील स्थानिक आदिवासी नागरिक याला प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. पावसाळ्यामध्ये येथे वाहणारे धबधबे या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजे. आहुपे रख्या अतिउंच व डोंगर भागामध्ये पर्यटनासाठी कुठल्याही प्रकारच्या राहण्याच्या अगर सुरक्षेच्या सुविधा नाहीत. या ठिकाणी भीमाशंकर विकास आराखड्यातून येथील विकास कामे करणे गरजेचे आहे. गेली २५ वर्षे भीमाशंकर विकास आराखडा टप्प्याटप्प्याने मार्गी लागत आहे. परंतु वन खात्याच्या अडचणीमुळे हा विकास आराखडा संथ गतीने सुरू आहे.
आदिवासी भागातील सुकामेव्यास पर्यटकांची पसंती
मंचर ते भीमाशंकर व मंचर ते आहुपे या मार्गावर मिनी बस सुविधा दर दोन तासाने असणे गरजेचे बनले आहे. आदिवासी भागात असणारा सुकामेवा खाण्यासाठी पर्यटक पसंती मिळते. या नागरिकांसाठी रस्त्यावर ठराविक अंतरावर टपऱ्या निर्माण केल्यास पर्यटक स्थानिक ग्रामस्थ यामध्ये अतूट नाते निर्माण होऊन व्यवसायाला उभारणी मिळेल. उन्हाळ्यात या ठिकाणी पाण्याची मोठी समस्या निर्माण होते. इथे कायमस्वरूपी एक मोठा तलावाचे काम करणे गरजेचे आहे. एकात्मिक आदिवासी प्रकल्पांतर्गत डिंभे धरणाच्या कडेला असणाऱ्या गावांमध्ये तरुणांना पर्यटनच्या दृष्टिकोनातून व्यवसाय सुरू करण्यासाठी विविध प्रकारच्या कर्ज योजना राबवणे आदिवासी शेतकऱ्यांसाठी हिताचे ठरणार आहे.
स्ट्रॉबेरीचे पिकासाठी प्रयत्न गरजेचे
आदिवासी भागातील शेतकऱ्यांसाठी स्ट्रॉबेरी पीक घेण्यासाठी कृषी विभागाने विविध योजना राबवून या ठिकाणी स्ट्रॉबेरीचे पीक मोठ्या प्रमाणात होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. डिभे धरणाच्या पायथ्याशी होणारे प्रशस्त गार्डन अजूनही दृष्टिक्षेपात येताना दिसत नाही त्या ठिकाणी पर्यटकांसाठी गार्डन लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासनाने लक्ष दिले पाहिजे.
......................
.03565, 03566, 03567
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.