शेतकऱ्यांची दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
घोडेगाव, ता. ९ : आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागांमध्ये यावर्षी पावसाच्या अनियमितपणामुळे शेतीत नुकसान झाले आहे. भात पिकांवर याचा सर्वाधिक परिणाम झाला असून, शेतकऱ्यांनी शासनाकडे दुष्काळ जाहीर करण्याची तहसीलदारांना नुकतेच निवेदन दिले आहे.
अतिवृष्टी झाल्याने भातासह इतर पिकांची वाढ खुंटली आहे. माजी सभापती सुभाष मोरमारे, माजी सभापती संजय गवारी, प्रकाश घोलप, नंदकुमार सोनावले, प्रदीप आमोंडकर, प्रवीण पारधी, धनंजय फलके, जितेंद्र गायकवाड यासह शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
दरम्यान, पेरणीनंतर सततच्या पावसामुळे रोपांची उगवण कमी झाली तसेच उगवलेली रोप मरल्याने काही ठिकाणी दुबार पेरणी करावी लागली, तर काही ठिकाणी पेरणी वाया गेली. जे पीक उगवले, तेही अनियमित पावसामुळे पूर्णपणे वाढू शकले नाही. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेती केली होती.मात्र आता पिकांच्या नुकसानीमुळे ते मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
पिकांची स्थिती पाहता यंदा उत्पादन मिळणे अशक्य आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी. शासनाने याची दाखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असे माजी सभापती संजय गवारी यांनी सांगितले.
आदिवासी भागातील ३९ गावांमध्ये पावसाच्या अनियमितेचा फटका भात पिकाला बसला आहे. या भागातील शेतकरी विविध मागण्या घेऊन मला घोडेगाव येथे भेटले आहेत. त्यांच्या सर्व मागण्या माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून सोडविणार आहे, असे विवेक वळसे पाटील यांनी सांगितले.
शेतकरी तुळशीराम मेचकर तळेघर, सिताराम कुडेकर आहुपे म्हणाले की, यावर्षी पंधरा दिवस अगोदरच वळवाचा मुसळधार पाऊस पडल्यामुळे जमिनीला वापसा नव्हता. चिखलामध्ये भात पेरणी करावी लागली. परंतु माती व चिखलामुळे भात रोपे विरळ उतरून आली. पाऊस पडतच राहिल्याने भात रोपे सुद्धा कुजून जात आहेत. भात रोपे कमी पडतील व भात लागवड पूर्ण होणार नाही.