घोडेगाव तहसील कार्यालयाच्या कामाबाबत नाराजी
घोडेगाव, ता. २४ : घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील तहसील कार्यालय विभागाचे काम वेळेत सुरू होत नाही. कर्मचारी वेळेत हजर राहत नाही. अधिकाऱ्यांचेही बऱ्याच वेळा उशिरा आगमन होते. याबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. नागरिकांची कामे होत वेळेत नसल्यामुळे या कार्यालयाबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.
‘सकाळ’च्या प्रतिनिधींनी आज सकाळी दहा वाजता तहसील कचेरीत पाहणी केली असता अनेक विभाग बंद असल्याचे दिसून आले. अकरा वाजेपर्यंत ५० टक्के कर्मचारी आपल्या जागेवर नव्हते.
शिरूर तालुक्यातील अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी आंबेगाव तालुक्यातील तहसीलदार कार्यालयात शैक्षणिक आणि आर्थिक मागास प्रवर्गाचा दाखला काढण्यासाठी आले असता. तहसीलदार कार्यालयातील अनेक आस्थापना आणि संबंधित कार्यालये बंद अवस्थेत आढळून आली. या प्रकाराबाबत ग्राहक पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी बंद असलेल्या कार्यालयांचे छायाचित्रे काढून तहसीलदारांकडे पाठवत याबाबत खुलासा मागितला आहे. याशिवाय तहसीलदार कार्यालयात तक्रार नोंदविण्यासाठी आवश्यक असलेली तक्रार वहीही उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. जिल्हा ग्राहक संरक्षण विभाग पुण्याचे सदस्य दिलीप बेंद्रे यांनी येथील परिस्थितीची माहिती दिली.
कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन तहसील कार्यालय बांधण्यात आले. उद्देश एकच होता या कार्यालयात नागरिकांची कामे वेगाने होतील. परंतु कामे राहिलीच बाजूला कार्यालयच बंद असल्याचे वारंवार निदर्शनात येत आहे. एक खिडकी योजना या कार्यालयात बंदच आहे. येथील सर्व कर्मचाऱ्यांना वेळेत उपस्थित राहण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी सुरू करावी. काम चुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी.
- नंदकुमार बोऱ्हाडे
सर्वच कर्मचारी आणि अधिकारी वेळेवर कार्यालयात असतात. बैठक व इतर कामामुळे ते कदाचित बाहेर गेले असतील. परंतु या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून कारवाई करू.
- डॉ. सचिन वाघ, तहसीलदार

