आंबेगावात चौरंगी लढतीने चुरस

आंबेगावात चौरंगी लढतीने चुरस

Published on

चंद्रकांत घोडेकर : सकाळ वृत्तसेवा
घोडेगाव, ता. २७ : आंबेगाव तालुक्यात ५ जिल्हा परिषद गट व १० पंचायत समिती गणांसाठी निवडणूक होत आहे. अर्ज माघारीच्या दिवशी एकूण ७ उमेदवारांनी ५ जिल्हा परिषद गटातून, तर १३ उमेदवारांनी पंचायत समिती गणातून माघार घेतली आहे. जिल्हा परिषद गटात व गणात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, काँग्रेस यांच्यात लढत होताना दिसत आहे. पंचायत समितीच्या १० जागांसाठी ३९ उमेदवार व जिल्हा परिषदेच्या ५ जागांसाठी १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे.
तालुक्यात पारगावतर्फे अवसरी गटात माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) व माजी उपाध्यक्ष अरुण गिरे (शिवसेना) यांच्यात लढत होत आहे. मागील निवडणुकीतही हे एकमेकांच्या विरोधात होते. त्यावेळी विवेक वळसे पाटील यांनी विजयश्री खेचून आणली होती. अपक्ष उमेदवार पुजा वळसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून शिवसेना पक्षात प्रवेश करून अरुण गिरे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. येथे किरण वाळुंज भाजपकडून व गणेश काकडे अपक्ष रिंगणात आहेत. आहे. येथे हाय व्होल्टेज लढत पाहावयास मिळणार आहे.
शिनोली गट या आदिवासी भागातील गटात अनिता आढारी (भाजप), शितल भारमल (काँग्रेस), शिला लोहकरे (राष्ट्रवादी काँग्रेस) यांच्यात लढत होणार आहे. अनिता आढारी या माजी जिल्हा परिषद सदस्य विजय आढारी यांच्या पत्नी आहेत. कमल बांबळे यांनी माघार घेतल्याने येथे तिरंगी लढत होत आहे.
घोडेगाव गटात माजी जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर यांच्या पत्नी सुवर्णा दरेकर (शिवसेना) यांना खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष नवनाथ हुले यांच्या पत्नी मंगल हुले (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) व प्रतिभा काळे (काँग्रेस) यांनी कडवे आवाहन उभे केले आहे.
कळंब गटातून माजी जिल्हा परिषद सदस्या तुलसी भोर (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), प्रीती थोरात (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार) यांच्या मागील निवडणुकीप्रमाणे पुन्हा लढत होत आहे. मागील वेळी प्रीती थोरात या शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात होत्या. भाजपने रेखा पोकळे यांना उमेदवारी दिली आहे.
अवसरी बुद्रुक गटात प्रशांत अभंग (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष) या नवख्या उमेदवाराने जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष विष्णू हिंगे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) यांच्यापुढे आवाहन उभे केले आहे. येथे काट्याची टक्कर होणार आहे. या गटात दादाभाऊ थोरात, गणेश पडवळ, नीलेश थोरात यांनी माघार घेतली आहे. मात्र, स्वाभिमानी पक्षाचे प्रभाकर बांगर हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com