विद्यार्थ्यांच्या कल्पकतेची विज्ञानभरारी

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेची विज्ञानभरारी
Published on

घोडेगाव, ता. ३० : पंचायत समिती आंबेगाव शिक्षण विभाग, आयुका वेधशाळा गिरवली व आयुका पुणे यांच्या वतीने मोरडे फुड्स प्रा. ली. मंचर यांच्या सहकार्याने आंबेगाव सुपर २३ उपक्रमातील यशस्वी २३ विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांची वैज्ञानिक सहल मुंबई येथे नेण्यात आली होती. विद्यार्थ्यांमधील जिज्ञासू, तसेच चौकस वृत्तीला आणि कल्पकतेला वाव मिळावा हा या उपक्रमाचा उद्देश होता.
आयुकाचे संचालक डॉ रघुनाथन श्रीआनंद, विज्ञान प्रसार अधिकारी समीर धुर्डे, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, संजय नाईकडे, प्रमिला वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला.
वैज्ञानिक शैक्षणिक सहलीच्या पहिल्या दिवशी होमी भाभा विज्ञान केंद्र, मुंबई येथे संस्थेचे संचालक शास्त्रज्ञ डॉ. अर्णव भट्टाचार्य यांनी विद्यार्थ्यांची संवाद साधला. मुलांनी प्रश्‍न विचारावेत, प्रत्येक घटनेमागील कार्यकारण भाव समजून घ्यावा. असा संदेश त्यांनी दिला. दुसऱ्या दिवशी मुलांना देशातील सर्वात मोठे परस्परसंवादी विज्ञान केंद्र पाहण्याची संधी मिळाली. यातील सायन्स ओडिसी आणि थ्रीडी शो ने विद्यार्थ्यांना विज्ञानाची रोमांचक सफर घडवून आणली.
नेहरू तारांगण येथील प्रमुख खगोलशास्त्रीय केंद्राच्या सहलीतून विद्यार्थ्यांनी खगोल शास्त्रज्ञ बनल्याचा आनंद उपभोगला. नेहरू तारांगणचे संचालक शास्त्रज्ञ डॉ. अरविंद परांजपे यांची प्रेरणादायी भेट आणि संवाद आनंददायी होता. राजभवनातील दरबार हॉलचे महत्त्व, राज्यपालांचे सचिव उमेश काशीकर यांनी समजावून सांगितले. सहलीत तालुक्यातील विविध केंद्रांमधील सहभागी २३ विद्यार्थ्यांसह विज्ञान शिक्षक सुनील पाटील, अरविंद मोढवे, वर्गशिक्षक रोहिदास सोनवणे, रेखा वळसे, कविता वळसे यांनी सक्रिय सहभाग घेतला.

विद्यार्थ्यांच्या मनात देशाभिमान जागृती
पाच हजार चौरस फूट क्षेत्रातील ब्रिटिशकालीन बंकर, १३ खोल्यांचा दारूगोळा साठवण्यासाठी केलेला उपयोग मुलांनी राज्यपालांचे सचिव उमेश काशीकर यांच्याकडून जाणून घेतला. बंकरच्या जागेतील भूमिगत संग्रहालयातील स्वातंत्र्यवीरांच्या कार्याने विद्यार्थ्यांच्या मनात देशाभिमान जागृत झाला. ही देशाची संपत्ती पाहून विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com