लक्ष्मण हाकेंच्या समर्थनासाठी नीरा बंद
गुळुंचे ता. १ ओबीसी नेते लक्ष्मण हाके व मराठा आरक्षण समर्थकांत झालेल्या बाचाबाचीनंतर सोमवारी (ता. १) ओबीसी संघटनेने नीरा (ता. पुरंदर) गाव बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे जीवनावश्यक सोईसुविधा वगळता अन्य साऱ्या अस्थापना बंद होत्या. दरम्यान, नीरा, पाडेगाव, गुळुंचे, कर्नलवाडी, पिंपरे, जेऊर, पिसुर्टी व परिसरातील वाड्यावस्त्यांवरील अनेकांनी नीरा शिवतक्रारच्या ग्रामपंचायत कार्यालयापुढे आळंदी- पंढरपूर महामार्गावर ठिय्या मांडून निषेध सभा घेतली. त्यात निषेध व्यक्त करण्यासाठी गावातील मराठा समाजातील जवळपास सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी गावातील ओबीसी व मराठा हे प्रवर्ग वेगळे असले तरी आमची मने भिन्न नसल्याचे यावेळी गावकऱ्यांनी दाखवून देत एकजुटीचे दर्शन घडविले.
हाके शनिवार (ता. ८) लोणंदच्या दिशेने जात असताना नीरा येथे काही तरुणांनी त्यांना हटकले. त्यानंतर बाचाबाची होऊन दोन्ही बाजूंकडून घोषणाबाजी झाली. या घटनेनंतर हाके यांनी आळंदी- पंढरपूर मार्गावर काही काळ ठिय्या मांडला होता. अखेरीस पोलिसांनी मध्यस्थी करून त्यांना पुढील वाट मोकळी करून दिली होती. त्यानंतर या तरुणांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी हाके व समर्थकांनी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात लाऊन धरली होती.
या घटनेचे संतप्त पडसाद सोमवारी नीरा येथे उमटले. सामाजिक सलोखा वृद्धींगत राखण्याचे आवाहन गावपुढाऱ्यांनी केले. घडलेली घटना अयोग्य असून, या चार पाच तरुणांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी लाऊन धरण्यात आली. यावेळी सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, दत्तात्रेय चव्हाण, संदीप धायगुडे, अनिल चव्हाण, दादासाहेब गायकवाड, दयानंद चव्हाण, राजेंद्र बरकडे, वसंत दगडे, सचिन मोरे, ॲड. आदेश गिरमे, प्रकाश कदम, शंकरराव मर्दाने, विजय धायगुडे, गणपत लकडे, शीतल चोरमले, राजेंद्र लकडे, बबन गोफणे, गणेश फरांदे, काळुराम चौधरी, गणेश गडदरे, गणेश केसकर आदींनी मनोगत व्यक्त केले. सभेचे प्रास्ताविक विक्रम दगडे यांनी केले. सूत्रसंचलन विष्णू गडदरे यांनी केले.
यावेळी लक्ष्मण हाके यांनी फोनद्वारे आवाहन केले. ते म्हणाले, ‘‘दहशत निर्माण करण्याचा हा प्रकार अयोग्य आहे. असाच प्रकार सुरु राहिला तर उद्या हे लोक घरातून बाहेर पडून देणार नाहीत. ओबीसी बांधवांनी आपल्या हक्कांविषयी जागृती दाखवावी. आमची मुले आत्ता कुठे चांगल्या पदांवर जात असताना आमच्या ताटातील आरक्षणात वाटा नको, एवढेच आमचे म्हणणे आहे. आमचे आरक्षण कायम राहावे, ही आमची भूमिका आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.