उच्चशिक्षित तरुणाचा पारंपरिक शेतीला फाटा

उच्चशिक्षित तरुणाचा पारंपरिक शेतीला फाटा

Published on

दत्ता भोंगळे, सकाळ वृत्तसेवा
सासवड शहर, ता. ४ : पिंपळे (ता. पुरंदर) येथील रहिवासी उच्चशिक्षित बीएस्सी झालेले तरुण महेश गुलाब पोमण यांनी सासवड (ता. पुरंदर) येथील शेतीमध्ये सहा प्रकारच्या बेरी उत्पादनाचा यशस्वी प्रयोग केला आहे. राजबेरी, ब्लॅकबेरी, स्ट्रॉबेरी, मलबेरी, गोजबेरी आणि ब्लूबेरी अशा एकूण सहा प्रकारच्या बेरीची १० गुंठ्यात लागवड केली आहे. यामधून त्यांना एका वर्षात १५ ते २० लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे.
यासाठी पोमण यांनी दीड लाख रुपये वार्षिक भाडेतत्त्वावर दहा गुंठे जमीन घेऊन त्या ठिकाणी पॉलिहाऊस उभे केले आहे. या पॉलिहाऊसमध्ये रेड राजबेरीसह इतरही वाणांचे त्यांनी गुणवत्तापूर्ण उत्पादनाचा यशस्वी प्रयोग केला आहे. त्यांनी रेड राजबेरीच्या ७०० रोपांची लागवड केली आहे. एका रोपाला एका वर्षात ११०० ग्रॅम राजबेरीचे उत्पादन मिळते. त्याला सरासरी प्रतिकिलो दोन हजार रुपयेप्रमाणे भाव मिळाला तरी वर्षाला सरासरी १५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.
बेरी या पिकाचे प्रामुख्याने परदेशात आणि थंड हवेच्या ठिकाणी उत्पादन घेतले जाते. पेरू आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांमध्ये या बेरीचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. मात्र, भारतात आणि महाराष्ट्रातील वातावरणात पोमण यांनी बेरीचे उत्पादन घेऊन शेतकऱ्यांसमोर मोठा आदर्श उभा केला आहे.
उच्चशिक्षित असलेले महेश पोमण यांनी वर्ष २०१९मध्ये आलेल्या कोरोना महामारीच्या संकटामध्ये त्यांचा नऱ्हे या ठिकाणी असलेला इंजिनिअर वर्कशॉपचा व्यवसाय बंद केला आणि गावी असलेल्या शेतामध्ये नवनवीन प्रयोग करायला सुरुवात केली. बाजारात बेरीला असलेली मागणी पाहता आपणही आपल्या शेतामध्ये याचे उत्पन्न घ्यावे, असा विचार त्यांनी केला आणि बेरीची लागवड केली व त्यांनी पोमण ऍग्रो फूड्स ही कंपनी स्थापन करून स्वतः मार्केटिंग करून पुणे, मुंबई, बंगलोर, हैदराबाद, दिली अशा शहरातील थेट ग्राहकांपर्यंत शेतीमाल पोचवला.
सासवड येथील पॉलिहाऊस भाडेतत्वावर घेऊन त्यामध्ये १० जुलै २०२५ रोजी राजबेरीच्या तीन व्हरायटीची लागवड केली. लागवड करताना टिश्यू कल्चरच्या ७०० रोपांची निवड केली. त्यामध्ये भारतात उत्पादन घेण्यासाठी रोगप्रतिकार क्षमता चांगली असणारी आणि महाराष्ट्रातील वातावरणास अनुकूल असणाऱ्या रोपांची निवड केली. त्यामध्ये लाल राजा, लाल राणी आणि लाल प्रधान अशा जातींची निवड करण्यात आली.
पोमण यांनी राजबेरी या पिकासाठी वातावरणातील बदल नियंत्रित करण्यासाठी पॉलिहाऊसचा वापर केला आहे, तर लागवडीनंतर ३ महिन्यात राजबेरीची काढणी केली. आतापर्यंत १०-१२ वेळा काढणी केली आहे. या राजबेरीला बाजारात २००० ते ४५०० रुपये प्रति किलो बाजारभाव मिळत असल्याची माहिती पोमण यांनी दिली आहे.

दृष्टिक्षेपात राजबेरी
सर्वसाधारण वातावरण वाढ
कमी पाण्यावर येणारे पीक
देशात, परदेशात बाजारपेठ उपलब्ध
मालाला सातत्याने मागणी
२ ते ५ हजार रुपये प्रतिकिलो भाव
रोगाचा प्रादुर्भाव कमी
एक वर्षानंतर रोपांचा खर्च नाही
लागवडी नंतर ५ वर्षे उत्पन्न मिळते

विविध रोपांची लागवड
पोमण यांनी सासवड आणि पिंपळे येथील शेतामध्ये राजबेरी ३ व्हरायटीची एकूण ७०० रोपे, इंडियन ब्लॅकबेरी १० रोपे, विंटर डाऊन आणि स्वीट सेंसेशन या स्ट्रॉबेरीच्या वाणाची २००० रोपे, इंडियन मलबेरीची ३००० रोपे, इंडियन गोजबेरीची १००० रोपे आणि बेरी लँड या वाणाच्या ब्लूबेरीची २०० रोपे लागवड केली आहेत.

कमी शेतीमध्ये जास्त उत्पादन आणि आधुनिक पद्धतीने शेती करून अधिक फायदा मिळविता येतो. पारंपरिक शेती सोबतच आधुनिक शेतीला अलीकडील शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले पाहिजे. स्थानिक
बाजारपेठे सोबतच जागतिक बाजारपेठेत या पिकांना मोठी मागणी असते. शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग आपल्या शेतात करावेत व अधिक फायदा करून घ्यावा.
- महेश पोमण, पदवीधर शेतकरी

पुरंदर सारख्या दुष्काळी भागासाठी महत्त्वाचे व नगदी उत्पन्न देणारे पीक, तसेच बदलणाऱ्या हवामानाचा विचार करता भविष्यात तरुण या पिकाकडे वळतील अशी अपेक्षा आहे.
-सिद्राम भुजबळ, माजी तालुका कृषी अधिकारी, पुरंदर

12370, 12371, 12372

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com