दिवे-गराडे गटात विकासाची नवी दिशा

दिवे-गराडे गटात विकासाची नवी दिशा

Published on

सकाळ वृत्तसेवा : दत्ता भोंगळे

सासवड शहर, ता. ६ : पुणे जिल्हा परिषदेच्या दिवे गराडे गटातून रूपाली अमोल झेंडे यांनी १४००० पेक्षा अधिक मतांनी विजय मिळविला. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून १९९९ ते २०२६ च्या निवडणुकीपर्यंत दिवे-गराडेगटामध्ये एकदाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हा परिषद सदस्य निवडून आला नव्हता. त्यामुळे हा विजय पुरंदर तालुक्यातील तसेच पुणे जिल्ह्यातील राजकीय जाणकारांसाठी चर्चेचा विषय राहिला.
वडगावशेरी मतदारसंघाचे विद्यमान आमदार बापूसाहेब तुकाराम पठारे यांची कन्या आणि डीसीपी अमोल भाऊसाहेब झेंडे यांची पत्नी अशी ओळख असली तरी, ‘सखी प्रेरणा मंचा’च्या माध्यमातून रूपाली झेंडे यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. रूपाली यांचे शिक्षण कै. तुकाराम धोंडीबा पठारे महाविद्यालय खराडी या ठिकाणी झाले. त्यांनी वाणिज्य शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. रूपाली यांचे वडील बापूसाहेब पठारे विद्यमान आमदार वडगाव शेरी हे खराडी गावचे सरपंच, पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक ते वडगावशेरी मतदार संघाचे प्रथम आमदार असा प्रवास त्यांनी त्याच्या लहान वयापासून पाहिला आहे. त्यामुळे राजकारणाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले.
२०१२ साली त्यांचा विवाह अमोल झेंडे यांच्याशी झाला. माहेर प्रमाणे सासरला देखील सामाजिक आणि राजकीय कार्याची पार्श्‍वभूमी असलेल्या घरची सून म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यांचे दीर अमित भाऊसाहेब झेंडे हे दिवे ग्रामपंचायतीचे सुरवातीला उपसरपंच आणि नंतर सरपंच होते, नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये दिवे गणातून अमित झेंडे हे पंचायत समिती मध्ये ११००० पेक्षा अधिक मताधिक्याने निवडून आले आहेत. त्यामुळे लोकांचा राबता हा माहेर प्रमाणे सासरमध्येही कायम होता. या सर्व निवडणुकांमध्ये रूपाली यांची प्रचाराची वॉर रूम सांभाळली होती. मात्र बऱ्याच वेळा क्षमता असूनही राजकीय प्रतिनिधित्व करण्याची संधी अनेकांना मिळत नाही. मात्र रूपाली यांना ती संधी महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मिळाली. स्वर्गीय अजित पवार यांनी आग्रह करून रूपाली यांना जिल्हापरिषदेची निवडणूक लढायला लावली.
निवडणुकीला तयारीला अगदी कमी वेळ मिळला तरी रूपाली यांनी सर्व मतदारसंघ अवघ्या वीस दिवसामध्ये पिंजून काढला. घरोघर नागरिकांच्या भेटी घेऊन, कोपरा सभा, गावभेट दौरे या माध्यमातून लोंकाच्या समस्या समजावून घेतल्या.आपल्या दिवे-गराडे गटासाठी जी कामे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करता येतील अशा कामांचा वचननामा तयार केला. ‘इष्ट असेल तेच बोलणार आणि साध्य होईल तेच करणार’ या उक्तीप्रमाणे त्यांनी आपल्या अखत्यारीत येत नाही अशा कोणत्याही कामाचा समावेश वचननाम्यात केला नाही आणि कोणतेही पोकळ आश्वासन त्यांनी प्रचारात लोकांना दिले नाही. कदाचित हा प्रामाणिकपणा लोकांना भावला. त्यामुळे एकूण झालेल्या ३६००० मतांपैकी तब्बल 22000 लोकांनी त्यांना भरभरून मते दिली.

सखी प्रेरणा मंच

महिला सक्षमीकरण, आरोग्य जनजागृती आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना स्वावलंबनाची दिशा देण्याचे काम सौ. रूपाली वहिनी अमोल झेंडे यांनी सातत्याने केले आहे. दिवे-गराडे गटातील महिलांसाठी त्यांनी “सखी प्रेरणा मंच” या व्यासपीठाची स्थापना केली. या मंचाच्या माध्यमातून आरोग्य शिबिरे, कौशल्य प्रशिक्षण आणि आर्थिक सक्षमीकरणाचे अनेक कार्यक्रम राबविण्यात आले आहेत.
ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे आणि स्थानिक विकासकामांना गती देणे हे त्यांच्या कार्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
सामाजिक कार्याची ही परंपरा पुढे नेत त्यांनी जनतेच्या विश्वासाने जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व मिळविले आहे. त्यांच्या नेतृत्वातून दिवे-गराडे गटात विकासाची नवी दिशा निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सध्या सखी प्रेरणा मंचाचे काम दिवे गराडे गटामध्ये सुरु आहे मात्र ह्याची व्याप्ती हि पूर्ण पुरंदर तालुक्यासाठी करण्याचे रूपाली वहिनींचे स्वप्न आहे.त्यासाठी लागणारी सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली असून लवकरच संपूर्ण पुरंदर तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांना सखी प्रेरणा मंचाचे सभासद करून घेण्यात येणार आहे.
सखी प्रेरणा मंचाच्या माध्यमातून महिलांची मोफत आरोग्य तपासणी केली जाते. यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर सारख्या तपासण्या देखील केल्या जातात. गर्भवती माता आणि किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य मार्गदर्शन असे उपक्रम राबविण्यात येतात .
महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्या तर कुटुंबाचा चांगला विकास होतो . त्यामुळे महिलांचा कौशल्य विकास व्हावा या उद्देश्याने त्यांना शिवणकाम , भरतकाम , फॅशन डिझायनिंग , दुचाकी -चारचाकी प्रशिक्षण तसेच इंग्लिश स्पिकिंग कोर्स याचे प्रशिक्षण देण्यात येते.
कृषी आणि कृषी आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि ग्रामीण महिलांना कृषी-आधारित उद्योगांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी फूड प्रोसेसिंग, शेतमाल मूल्यवर्धन आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे.
यामुळे महिलांना स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध होत आहे.

विकासाची नवी वाट...
रूपाली यांची पुढील वाटचाल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय व्यापक आणि दूरदर्शी आहे. जिल्हा परिषद सदस्या म्हणून निवडून आल्यानंतर दिवे-गराडे गटातील विकासकामांना गती देण्याचा रूपाली वहिनींचा संकल्प आहे.

१) पुरंदर तालुका हा फळझाडांसाठी प्रसिद्ध आहे. या भागातील अंजीर, पेरू आणि सीताफळ बाहेरच्या देशामध्ये निर्यात केले जाते. मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्ये शोभेच्या फुलांची शेतीदेखील केली जाते. मात्र हा सर्व माल नश्वर आहे. जर या मालाला योग्य वेळेत आणि चांगल्या स्थितीत बाजरपेठ नाही मिळाली तर शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होते. त्यामुळे हा पाणंद रस्ते तसेच शेतापासून मुख्य रस्त्यापर्यंतच्या जाणारे रस्ते दुरुस्त करणे. तसेच नवीन रस्ते तयार करणे. त्याचबरोबर जो शेतीमाल बाहेर विकला जात नाही त्यासाठी कोल्डस्टोरेज बांधून त्याच्यावर प्रोसेसिंग करणे. यांसारख्या उद्योगांना राज्यशासन आणि जिल्हा परिषद यांच्या मार्फत अनुदान मिळते. या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा मानस आहे.
२) जिल्हा परिषदेच्या शाळा या डिजिटल करून विद्यार्थ्यांना इ लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण देणे. त्यांच्यासाठी सुसज्ज असे संगणक कक्ष तयार करणे. त्याचबरोबर मुलींच्या सुरक्षेसाठी शाळांमध्ये CCTV बसवणे. प्रत्येक शाळेमध्ये चांगल्या प्रकारची स्वच्छता गृहे तयार करणे.
३) प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आरोग्य उपकेंद्र सक्षम करून त्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी साधनसामुग्री उपलब्ध करून देणे. ज्या उपकेंद्रांना २०२२ च्या शासन आदेशाने मंजुरी मिळाली आहे, मात्र काही कारणास्तव ही केंद्र अद्याप सुरू झाली नाहीत. यासाठी जिल्हा परिषदेच्या पहिल्या सभेत मंजुरी घेऊन थांबलेल्या कामांना गती देणे. महिलांच्या प्रसूती दरम्यान माता आणि बालमृत्यू यांचे प्रमाण पूर्णपणे शून्यावर आणणे आणि त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अत्याधुनिक करणे आवश्यक आहे. १०२/१०८ अँब्युलन्स सेवा अधिक प्रभावी करण्यावर त्यांचा भर असेल.
४) प्रत्येक गावामध्ये नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी सांडपाण्याची चांगली व्यवस्था करणे तसेच कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करून त्यामधून खतनिर्मितीसाठी प्रयत्न करणे.
५) जल जीवन मिशनमधील अपुऱ्या कामांना गती देऊन ज्या गावामध्ये जल जीवन मिशनची कामे झाली नाहीत त्याठिकाणी नव्याने मंजुरी मिळवून वंचित गावांना याचा लाभ मिळवून देणे.
६) संजय गांधी निराधार योजना हि गरजू व्यक्ती पर्यंत फक्त कागदपत्रांच्या अभावी पोहचत नाही. दिव्यांग आणि विधवा महिला ज्या शासकीय योजनेपासून वंचित आहेत अशा सर्व वंचित घटकांना या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी लागणारे मार्गदर्शन करून त्यांना योजनेसाठी आवश्यक ओळखपत्र मिळवून देणे.

महिला सक्षम झाल्या तर समाजाचा विकास अधिक वेगाने होतो. ग्रामीण भागातील महिलांना शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे माझे ध्येय आहे.
- रूपाली अमोल झेंडे (जिल्हा परिषद सदस्या)

(उजवीकडील माहिती बॉक्स)

सखी प्रेरणा मंचाचे प्रमुख उपक्रम
• मोफत महिला आरोग्य तपासणी
• कर्करोग तपासणी शिबिरे
• मातांसाठी आरोग्य मार्गदर्शन महिला कौशल्य विकास
• इंग्रजी स्पीकिंग कोर्स
• दुचाकी व चारचाकी प्रशिक्षण
• शिवणकाम व फॅशन डिझायनिंग महिला आर्थिक सक्षमीकरण
• बचत गटांना प्रोत्साहन
• उद्योग मार्गदर्शन
• विद्यार्थिनींसाठी आर्थिक साहाय्य कृषी व उद्योग
• फूड प्रोसेसिंग प्रशिक्षण
• शेतमालाला मूल्यवर्धन
• बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मदत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com