कोतवालांच्या संपाचा शेतकऱ्यांरी हैराण
गुनाट, ता. १५ : महिन्याभरापासून सुरू असलेल्या महसूल विभागाच्या अभिलेख शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या (कोतवाल) संपाचा फटका शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. स्वतःच्याच जमिनींच्या कागदपत्रांसाठी शेतकऱ्यांना नाहक हेलपाटे मारावे लागत आहेत. सातबारा, फेरफार, तसेच अत्यावश्यक कामांसाठी कागदपत्रेच वेळेत मिळत नसल्याने तालुक्यातील शेतकरी हतबल झाला आहे.
महसूल सेवकांना (कोतवाल) चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा यासाठी १२ ऑगस्टपासून तालुक्यातील महसूल कर्मचारी कोतवाल संघटनेच्या वतीने कामबंद आंदोलन सुरू आहे. तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षात शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची देवाणघेवाण करण्यासाठी हेच सेवक कार्यरत आहेत. मात्र हेच कर्मचारी संपावर गेल्याने हा कक्षच बंद पडला आहे. त्यात कार्यालयातील इतर महसुली कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण असल्याने येथे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात मर्यादा येत आहेत.
यंत्रणा सध्या ठप्प
शिरूर तालुक्यातील गावांची संख्या शंभरच्या आसपास असल्याने येथील दस्तऐवजची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे जे कर्मचारी येथे उपलब्ध करून दिले जातात, त्यांना ही कागदपत्रे शोधण्यात नाकी नऊ येतात. परिणामी येथील यंत्रणा सध्या ठप्प झाली आहे. आवश्यक कागदपत्रांसाठी अर्ज केला तरी कागदपत्रे नेमकी कधी मिळतील. याची कसलीही शाश्वती नसल्याने शेतकरी संप मिटण्याची वाट पाहत आहे.
संपाचा काळात शेतकऱ्यांना वेळेत कागदपत्रे मिळण्याबाबत अनेकदा इतर महसुली कर्मचाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली होती. कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या असतानाही शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही. याचे नियोजन करण्यात आले. पुढच्या दोन दिवसांत हा कक्ष व्यवस्थितपणे कार्यरत होईल.
- बाळासाहेब म्हस्के, तहसीलदार, शिरूर
आजच्या महागाईच्या काळात आमचे सहकारी वर्षानुवर्षे तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. चतुर्थ श्रेणीत आमचा समावेश करण्यासाठी आजवर अनेकदा शासनदरबारी पाठपुरावा करतोय. आम्हाला ही संसार आहे. किती काळ तुटपुंज्या पगारावर आम्ही नोकऱ्या करायच्या? आमच्या न्याय मागण्यांसाठी लढणे ही आमची गरज आहे.
- अब्दुल शेख, अध्यक्ष, शिरूर तालुका महसूल कर्मचारी कोतवाल संघटना
सातबारा, फेरफार, क.ड.ई. पत्रक अशा शेती संबंधी विविध कामांसाठी शेतकरी महिनाभरापासून येथे हेलपाटे मारत आहे. शासकीय कर्मचाऱ्यांचे संप, आंदोलने हे काही वाहनांसाठी नवीन बाब नाही. त्यामुळे असे प्रसंग उद्भवण्याच्या आधीच संप काळात पर्यायी सक्षम यंत्रणा संबंधित यंत्रणेने उभारणे गरजेचे आहे.
- दिलीप बेंद्रे, अखिल भारतीय ग्राहक पंचायत समिती जिल्हा कार्यकारिणी सदस्य
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.