तरुणाई ‘एम. डी.’ च्या आहारी
गुनाट, ता. १६ : मेथेड्रोन (एम. डी.) या अमली पदार्थांच्या सेवनाचा तालुक्यातील तरुण पिढीला दिवसेंदिवस विळखा पडत चालला आहे. या अमली पदार्थांच्या सेवनाच्या दुष्परिणामामुळे तालुक्यातील चार ते पाच तरुण खासगी रुग्णालयात उपचार घेत असून जीवन मरणाच्या उंबरठ्यावर उभी आहेत. त्यातच हे लोण आता ग्रामीण भागातही पसरले आहे.
करडे (ता. शिरूर) व परिसरात या पदार्थांची विक्री करणारे दलाल सक्रिय असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. दारू, सिगारेट, मावा या व्यसनांच्या यादीत आता मेथेड्रोन या अमली पदार्थांचाही नव्याने समावेश झाला आहे. इतर अमली पदार्थांच्या तुलनेत या ड्रग्जच्या सेवनाची नशा कित्येक पटीने अधिक असल्याने याच्या सेवनाकडे तरुणाई दिवसेंदिवस आकर्षित होत आहे. औद्योगिक वसाहत किंवा शिरूर शहराच्या आसपास या मालाची विक्री करणारे दलालांनी आता ग्रामीण भागातील तरुणांना लक्ष्य केले आहे. ग्रामीण भागातही तरुणांच्या ओठांवर ‘एम. डी . शिवाय मजा नाही’ हा डायलॉग सहज ऐकायला मिळतो. तरुणाईबरोबरच ज्येष्ठ मंडळीही या नशेची शौकीन झाली आहेत.
या अमली पदार्थांच्या विक्रीतून होणारी आर्थिक उलाढाल मोठी आहे. त्यामुळे या मालाची विक्री करणारे दलाल ज्या तरुणांना नशेसाठी हा माल विकतात, त्यांनाच जादा कमिशनचे आमिष दाखवून दलालासाठी तयार करतात. त्यामुळे हा अमली पदार्थांची नशा करण्याची आणि त्याची विक्री करण्याची एक मोठी साखळीच तालुक्यात तयार झाली आहे.
तालुक्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलिस यंत्रणा सक्षमपणे काम करत आहे. या अमली पदार्थांच्या विक्रीवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. येत्या काळात ही यंत्रणा समूळ नष्ट करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- संदेश केंजळे, पोलिस निरीक्षक, शिरूर पोलिस ठाणे.
रांजणगाव औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याच्या अखत्यारीत सर्वच गावांतील शाळा, महाविद्यालये, पालक वर्गामध्ये आम्ही अमली पदार्थांचे दुष्परिणाम याविषयी प्रबोधन करत आहोत. आम्हीही दोन वेळा या पदार्थांच्या विक्रीवर कारवाई केली आहे.
- महादेव वाघमोडे, पोलिस निरीक्षक, रांजणगाव औद्योगिक वसाहत.
या अमली पदार्थांच्या सेवनाचे शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही बाजूंनी मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. आवड म्हणून सुरू झालेले हे व्यसन केवळ विनाशाकडे नेणारे आहे. याविषयी समाजात खोलवर जनजागृती करणे आवश्यक आहे.
- डॉ. अखिलेश राजूरकर, श्री गणेशा हॉस्पिटल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.