भाग गेला क्षीण गेला। अवघा झाला आनंद ॥
इंदापूर, ता. २९ : आता कोठे धावे मन।
तुमचे चरण देखिलीया ॥
भाग गेला क्षीण गेला ।
अवघा झाला आनंद ॥
प्रेमरसे बैसली मिठी ।
आवडी लाठी मुखाची ॥
तुका म्हणे आम्हा जोगे।
विठ्ठल घोगे खरे माप ॥
अभंग गात, ऊन सावलीच्या खेळात पांडुरंग भेटीची आस घेऊन पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण इंदापूर शहरामध्ये उत्साहात संपन्न झाले. यावेळी लाखो वैष्णवांनी नेत्रदीपक रिंगण सोहळा अनुभवला. दरम्यान पालखी सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण इंदापूर नगरी भक्तीमय झाली. यंदा एकच मुक्काम असल्याने भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती.
हातात झेंडे घेऊन धावणारे झेंडेकरी, तुळशी डोक्यावर घेऊन धावणाऱ्या महिला वारकरी, टाळ मृदुंगाचा गजर करीत धावणारे हजारो माऊली, वीणा घेऊन धावणारे वैष्णव व शेवटी वायुवेगाने धावणारे अश्व असा अभूतपूर्व सोहळा इंदापूरकरांनी
अश्व धावे अश्वामागे ।
वैष्णव उभे रिंगणी।
टाळ मृदंगा संगे ।
गेले रिंगण रंगुनी ।।
या उक्तीचा याची देही याची डोळा अनुभवला.
जगतगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे रविवारी (ता.२९) सकाळी इंदापूर शहरात आगमन झाले. यावेळी इंदापूरकरांनी भक्तिमय वातावरणात पालखी सोहळ्याचे स्वागत केले त्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुरबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या मैदानावर रिंगण सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती.यावेळी प्रथम झेंडेकरी, नंतर विणेकरी, नंतर तुळसधारी महिला यांनी पालखी रिंगणात धावत प्रदक्षिणा घातली. त्यानंतर मानाचा अश्वाचे पूजन माजी उपनगराध्यक्ष भरत शहा व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर नेत्रदीपक अश्वाचे रिंगण संपन्न झाले.
यावेळी माजी खासदार राहुल शेवाळे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी उपनगराध्यक्ष व कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भरत शहा, युवा नेते राजवर्धन पाटील अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड, तहसीलदार जीवन बनसोडे, पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे, गटविकास अधिकारी सचिन खुडे यांचेसह विविध राजकीय पक्षाचे आजी माजी पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी आरती झाल्यानंतर पालखी सोहळा मालोजीराजे भोसले औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या भव्य पालखी मुक्काम स्थळी विसावला.याठिकाणी दिवसभर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान पालखी मार्गावर इंदापूरकरांच्या वतीने विविध सामाजिक संघटना, तरुण मंडळे यांच्या वतीने वैष्णवांच्या सोयीसाठी चहापान अल्पोपाहार,फळे वाटप, आरोग्य तपासणी यासारखे विविध उपक्रम राबवून वैष्णवांची सेवा करण्यात आली.
-
अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांचा रिंगणात सहभाग
इंदापूर येथील रिंगण सोहळ्यानिमित्त उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड, इंदापूरचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी पालखी सोहळा बंदोबस्तातील पोलिस अधिकारी,कर्मचारी यांनाही रिंगण सोहळ्यात सहभागी होत पालखीला धावत प्रदक्षिणा पूर्ण केली.तसेच पोलिसांनी रिंगणाच्या भजनात तल्लीन होत वारकऱ्यांसोबत फुगडी खेळण्याचाही आंनद लुटला.
-
अश्वांच्या टापांची माती ललाटी
इंदापुरमध्ये माऊलींचा पारंपरिक मानाचा नगारखाना दाखल होताच. वैष्णवांच्या उत्साहाने सारा आसमंत भक्तिरसात चिंब होऊन गेला. रिंगण लावून झाल्यानंतर चोपदारांनी हात उंचावून इशारा करताच वैष्णवांच्या मेळ्यातून माउलींचा गजर झाला. रिंगणातून अश्व एका पाठोपाठ धावत सुटले. लक्ष-लक्ष डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या
अश्वांच्या दौडीने आषाढी वारीतील दुसरे गोल रिंगणाचा सोहळा उत्सवात संपन्न झाला.यावेळी मैदानावरील अश्वांच्या टापाची माती ललाटी लावत वैष्णवांनी धन्य झाल्याची भावना व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.