इंदापूर शहरातील वैकुंठभूमीची दुरवस्था

इंदापूर शहरातील वैकुंठभूमीची दुरवस्था

Published on

इंदापूर, ता. ५ : इंदापूर शहरातील १०० फुटी रस्त्यालगत असलेल्या वैकुंठभूमीची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली असून अग्निदानासाठी असलेल्या जागेची झालेली दुरवस्था, महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृहांची अनुपलब्धता, स्वच्छतेचा अभाव यांमुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. किमान शेवटचा प्रवास तरी सुखकर व्हावा, अशी अपेक्षा स्थानिकांकडून केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, इंदापूर शहरासाठी शंभर फुटी मार्गावर, ज्योतिबा माळाच्या पाठीमागे, देवीच्या मंदिरालगत अशा तीन ठिकाणी स्मशानभूमी आहेत. मात्र यामध्ये सुविधांची तसेच नियोजनाची वानवा दिसून येते. शहरातील शंभर फुटी मार्गावरील स्मशानभूमीमध्ये सध्या सर्वत्र मोठे गवत वाढले आहे. नियमित साफसफाई होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव असल्याने शोकाकूल वातावरणात आलेल्या महिला आणि पुरुष नातेवाइकांची गैरसोय होत आहे. यामध्ये महिलांना तर अत्यंत गैरसोयीला सामोरे जावे लागत असून, ही बाब मूलभूत हक्कांचा अपमान ठरत आहे.
एवढेच नाही तर अग्नीदानासाठीची जागा खचलेली, धोकादायक बनली आहे. यामध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जिथे अग्नी दिला जातो त्या ठिकाणी फरशी तुटलेली, जमीन खचलेली असून, तसेच कडेचे रॉडही तुटलेले आहेत. त्यामुळे अंत्यसंस्कार करताना मोठी अडचण होते. यामुळे याबाबत तत्काळ उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

या उपाययोजनांची गरज
•नियमित सफाई कर्मचारी नेमावेत.
•स्वच्छतागृहाची उभारणी केली जावी.
•अग्नीदानासाठी योग्य जागेची पुनर्बांधणी करावी.
•एलईडी लाइट व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.
•परिसरात वाढलेली झाडे झुडपे गवत काढून टाकावे.
•दशक्रिया विधीसाठीचे नियोजन करावे.

वैकुंठभूमी हे केवळ अंत्यसंस्काराचे ठिकाण नसून, ते श्रद्धा आणि सन्मानाचे स्थान आहे. त्यामुळे त्या ठिकाणी स्वच्छता, सुविधा आणि योग्य व्यवस्थापन असणे गरजेचे आहे. इंदापूर शहरांमध्ये दशक्रिया विधीवेळी मोठी गैरसोय होत आहे.यामुळे स्मशानभूमी परिसरातच आवश्यकतेप्रमाणे बांधकाम करून पाणी मंदिराचे योग्य नियोजन करीत अंमलबजावणीची गरज आहे.
- अरविंद वाघ, माजी उपनगराध्यक्ष, इंदापूर

कोट्यवधी रुपयांची गॅसदाहिनी धूळखात
वृक्षतोड रोखण्यासाठी व पर्यावरणाचा समतोल ठेवण्यासाठी क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या पुढाकारातून इंदापूर शहरातील स्मशानभूमीमध्ये १ कोटी ८ लाख रुपये खर्च करून चार वर्षापूर्वी तयार केलेली गॅस शवदाहिनी वापराविना धुळखात पडलेली आहे. याकडे कोणाचेही लक्ष नसल्याने शासनाचे कोट्यवधी रुपये वाया गेल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे सरपणाचे वाढते दर व तुटवडा निर्माण होत असल्याने मृत व्यक्तीच्या दहनविधीमध्ये कुटुंबांना ५ ते १० हजार रुपये मोजावे लागत असल्याने आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत आहे.

शहरातील शंभर फुटी मार्गावरील स्मशानभूमी परिसरात वाढलेले गवत तत्काळ काढण्यात येईल, तसेच इतर कामेही करण्यात येतील.
- रमेश ढगे, मुख्याधिकारी, इंदापूर नगरपरिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com