शिक्षण विभागाचा डोलारा प्रभारी अधिकाऱ्यांवर

शिक्षण विभागाचा डोलारा प्रभारी अधिकाऱ्यांवर

Published on

इंदापूर, ता. २५ : इंदापूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षण विभागात पदभरतीचा प्रश्‍न अधिक गंभीर बनला आहे. गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांच्यासह शिक्षकांची अनेक पदे रिक्त असल्याने शिक्षण विभागाचा डोलारा प्रभारी अधिकाऱ्यांवरच आहे. यामुळे शाळांचे नियोजन, प्रशासकीय समन्वय, निरीक्षण आणि गुणवत्ता सुधारणा या सर्वच बाबतींत अडथळे निर्माण होत असून, तत्काळ रिक्त पदे भरण्याची मागणी होत आहे.
तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या सुमारे ५२५ हून अधिक शाळा आहेत, मात्र तालुक्यात गटशिक्षणाधिकारी पदासह शिक्षण विभागांतर्गत विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, तसेच शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. यामुळे तालुक्यात कुठे चार-पाच केंद्रांना एकच केंद्रप्रमुख, कुठे अतिरिक्त कारभार, तर कुठे दोन वर्गासाठी एकच शिक्षक असा कार्यभार देण्यात आला आहे. यामुळे गुणवत्ता कशी सुधारणार आणि त्याचे मूल्यमापन कोण करणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.
एकट्या इंदापूर तालुक्यात शिक्षण विभागातील एकूण १५१ हून अधिक जागा रिक्त असून यामुळे पर्यवेक्षणाच्या तसेच संनियंत्रणाच्या‌ कामात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. याचा परिणाम अनेक शाळांतील विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर होत असल्याने त्यांच्या गुणवत्तेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

गटशिक्षणाधिकारी पदच प्रभारी
तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रातील प्रमुखपदाची धुरा सांभाळणारे पद असलेले इंदापूरचे गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात यांची १६ जूनला बदली झाली. त्यानंतर तालुक्याचा शिक्षण विभागाचा कारभार बारामतीचे गटशिक्षणाधिकारी नीलेश गवळी यांच्याकडे प्रभारी स्वरूपात देण्यात आला. यामुळे गटशिक्षणाधिकारी पदापासूनच तालुक्याचा पूर्ण भार हा प्रभारी अधिकाऱ्यांवर आहे.

अतिरिक्त जबाबदाऱ्यांचा भार
इंदापूर तालुक्यात शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची सहा पदे मंजूर आहेत, मात्र यातील तीन पदे रिक्त असून तिघांवरच कार्यभार येऊन पडला आहे. तसेच केंद्रप्रमुखांची २६ पदे मंजूर असून तेथेही तीनच जण कार्यरत आहेत. तर मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक व सहशिक्षक यांचीही ५५ पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार पडत आहे.

रिक्त पदांचा कामावरील परिणाम
- प्रभारी अधिकाऱ्यांमुळे निर्णय प्रक्रियेत विलंब
- गुणवत्तापूर्ण शिक्षणावर परिणाम
- निरीक्षण व वेळेवर अहवाल सादरीकरणात अडथळा
- विद्यार्थ्यांना नियमित मार्गदर्शनात अडथळे
- शिक्षकांवर अतिरिक्त जबाबदाऱ्या

इंदापूर तालुक्यातील शिक्षण विभागातील रिक्त असलेली पदे जिल्हा स्तरावर भरण्याची प्रक्रिया होत असते. रिक्त जागांबाबत वरिष्ठ कार्यालयास माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यादृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
- नीलेश गवळी, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती इंदापूर

रिक्त पदांची आकडेवारी
पदाचे नाव - मंजूर पदे - कार्यरत पदे - रिक्त पदे
- गटशिक्षणाधिकारी - १ - ० - १
- शिक्षण विस्तार अधिकारी - ६ - ३ -३
- केंद्रप्रमुख - २६ - ३ - २३
- मुख्याध्यापक - २४- १३ - ११
- पदवीधर शिक्षक - ५० - ४४ - ०६
- उपशिक्षक - ९२४ - ८८६ - ३८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com