जुन्या शासकीय ग्रामीण रुग्णालयाची इमारत पाडल्याने वादंग

जुन्या शासकीय ग्रामीण रुग्णालयाची इमारत पाडल्याने वादंग

Published on

इंदापूर, ता. ८ : इंदापूर शहरातील मुख्य पुणे सोलापूर महामार्गालगत असलेल्या बाबा चौक येथील जुन्या ग्रामीण रुग्णालयाची इमारत विश्वस्त व्यंकटेश देवस्थान ट्रस्ट इंदापूर यांनी पाडल्याने याबाबत अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात असल्याने वादंग निर्माण झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, इंदापूर शहरात पूर्वी शासकीय ग्रामीण रुग्णालयाची इमारत बाबा चौक येते होती. अनेक वर्ष त्या ठिकाणाहून इंदापूरकरांच्या आरोग्याची सेवा पुरविण्यात आली. कालांतराने इंदापूरसाठी उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाल्याने पडस्थळ रोडवर नव्याने प्रशस्त बांधलेल्या इमारतीमध्ये कामकाज हस्तांतरण केले. यामुळे ही जुनी इमारत गेल्या अनेक वर्षांपासून वापराविना बंद होती. मात्र ४ जून रोजी विश्‍वस्त व्यंकटेश देवस्थान ट्रस्ट दीपक नारायण देशपांडे यांनी नगर परिषदेकडे धोकादायक इमारत पाडण्याबाबत अर्ज केला आणि त्यानुरूप ३१ जुलै २०२५ रोजी नगरपरिषदेने ही ग्रामीण रुग्णालयाची इमारत पाडण्याची परवानगी दिली.
यावरून शासकीय इमारत पाडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचा अहवाल घेतला का? इमारत पडण्याची परवानगी देण्याचा अधिकार नगरपरिषदेस आहे का? इंदापूर नगर परिषदेने ही इमारत पाडण्यासाठी परवानगी देताना जिल्हा परिषदेसह इतर शासकीय यंत्रणांची परवानगी घेतली होती का? ग्रामीण रुग्णालयाची जागा नेमकी कोणाच्या मालकीची आहे? यांसह अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
असे असताना परवानगी मिळाल्यानंतर तत्काळ दोन-तीन दिवसात ही इमारत जमीन दोस्त करण्यात आली. यामधून काढण्यात आलेल्या जुन्या लाखो रुपयांची साधन सामग्री कुठे गेली. असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. तसेच शासकीय ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकाम करताना सरकारने त्यावर लाखो रुपये खर्च करून इमारत बांधलेली आहे. शासन कोणत्याही जागेवर निधी टाकत असताना ती जागा शासनाच्या मालकीची असावी असा नियम आहे. मात्र ही जागा जर देवस्थानची होती तर त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय कसे बांधण्यात आले. इमारत पडल्यानंतर त्यामध्ये निघालेले साधनसामग्रीचे काय झाले? ही साधनसामग्री कोणाच्या मालकीची आहे? असे प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत.

याबाबत बोलताना व्यंकटेश देवस्थान ट्रस्टचे उदय देशपांडे म्हणाले की, ही जागा ट्रस्टची आहे. या ठिकाणी आम्ही कॅन्सर रुग्णालय उभारणार आहोत.

ग्रामीण रुग्णालय हे जिल्हा परिषदेच्या मालकीचे असते. इंदापूर येथील जुने ग्रामीण रुग्णालयाची जागा देखील जिल्हा परिषदेच्या मालकीची आहे. ही जागा काही लोक बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही इंदापूर नगरपालिकेकडे याबाबत पत्रव्यवहार करणार आहे. तसेच कायदेशीर लढा उभारणार आहोत.
- ॲड. अशुतोष भोसले

व्यंकटेश देवस्थान ट्रस्ट इंदापूर तर्फे विश्वस्त दीपक देशपांडे यांनी नगरपालिकेकडे मालमत्ता क्र. INDA00003234 (W7Z1003247) धोकादायक जुनी इमारत पाडण्यास परवानगी मिळण्याबाबत अर्ज केला होता. यावरून त्यांना ३१ जुलै २०२५ रोजी परवानगी देण्यात आली. मात्र त्यानंतर ही मालमत्ता म्हणजे जुने ग्रामीण रुग्णालय असल्याची बाब निदर्शनास येताच तत्काळ दिलेला परवाना रद्द करीत पुढील आदेश होईपर्यंत काम बंद करण्याबाबत संबंधितांना लेखी दिले आहे. आणि तरीही जर काम सुरूच राहिले असेल तर पुढील कारवाई करण्यात येईल.
- रमेश ढगे, मुख्याधिकारी इंदापूर नगरपरिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com