इंदापूर बस स्थानकावर मध्यरात्री एसटी खाक
इंदापूर, ता. २६ : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या इंदापूर शहरातील बस स्थानकावर प्रवासी घेऊन आल्यानंतर उभ्या असलेल्या बसने अचानक पेट घेतला. यावेळी प्रवासी आणि चालक वाहक यांच्या प्रसंगावधानाने सर्व प्रवासी बसमधून बाहेर आले. यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही; मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण बस जळाली यामध्ये काही प्रवाशांचे साहित्यही जळून खाक झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी (ता. २५) धाराशीव येथून रात्री १०च्या सुमारास पुण्याकडे निघालेली बस (क्र. एमएच २० बीएल ४२३३) मध्यरात्री दोनच्या सुमारास इंदापूर बस स्थानकाच्या फलाट क्रमांक ११ वर आली. यावेळी बस सुरू ठेवून चालक नोंदणी करण्यासाठी वाहन नोंदणी कक्षात गेले. यावेळी बसमधून काही प्रवासीही खाली उतरले होते. त्यांना बसच्या इंजिनच्या खाली जाळ दिसला. त्यांनी तत्काळ ही बाब वाहनचालक आणि वाहकाच्या निदर्शनास आणली. यावेळी बसमधील प्रवाशांना बसच्या बाहेर पडण्याचे आवाहन केले गेले. तसेच बसचे वाहक आणि चालक स्वतः बसमध्ये शिरले. बसमध्ये असलेल्या प्रवाशांचे साहित्य बाहेर काढण्यास मदत केली. मात्र, त्यानंतर आगीने रौद्ररूप धारण केल्याने सर्व साहित्य बाहेर काढता आले नाही. या आगीमुळे बस आणि काही प्रवाशांच्या साहित्याचे पूर्णपणे नुकसान झाले. प्राथमिक माहितीनुसार इंधन गळतीमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे.
अग्निशामक यंत्रणेचा अभाव
पुणे-सोलापूर महामार्गावर मध्यवर्ती बसस्थानक म्हणून ओळख असलेल्या इंदापूर बसस्थानक मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. औसा, निलंगा, लातूर, बार्शी, कुर्डुवाडी, सोलापूर, कर्नाटक येथे अनेक बसेस याच बस स्थानकातून पुढे मार्गस्थ होतात. मोठ्या प्रमाणावर बसेसची आवकजावक होते. नियमित हजारो प्रवासी प्रवास करीत असतात; मात्र अशा महत्त्वाच्या स्थानकावर आपत्कालीन परिस्थितीमध्ये बसमध्ये तसेच बस स्थानकावर अग्निशामक यंत्रणा नसणे ही गंभीर बाब या निमित्ताने पुढे आली असून याबाबत तत्काळ कायमस्वरूपी उपाययोजना होणे आवश्यक आहे.
अग्निशमन यंत्रणा पोहोचण्यास विलंब
इंदापूर बस स्थानकावर आगीची घटना घडल्यानंतर काही वेळाने इंदापूर बस आगारातून काही कर्मचारी अग्नी सुरक्षा यंत्रणा घेऊन बस स्थानकात दाखल झाले. मात्र तोपर्यंत विलंब झाला होता. याच दरम्यान इंदापूर नगर परिषदेची अग्निशामक यंत्रणाही दाखल झाली होती; मात्र तोपर्यंत संपूर्ण बस आगीच्या भक्षस्थानी पडली होती.

