इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार रामभरोसे

इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार रामभरोसे

Published on

इंदापूर, ता. ३ : इंदापूर उपजिल्हा रुग्णालय सध्या अक्षरशः राम भरवसे चालले असल्याचे सोमवारी (ता.३) प्रत्यक्ष पाहणीत उघड झाले. नऊ वाजता सुरू होणारे कामकाज स्वच्छतेपासून सुरू होताना दिसले; डॉक्टर आणि अनेक कर्मचारी मात्र दहा वाजत आले तरी अनुपस्थित होते. यामुळे वेदनेने घायाळ होत आलेले रुग्ण मात्र डॉक्टरांच्या येण्याकडे डोळे लावून बसले होते.
इंदापूर शहरासह तालुक्यातील आरोग्यसेवेचा कणा मानले जाणारे इंदापूर उपजिल्हा रुग्णालयासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून सुसज्ज इमारत अत्याधुनिक सेवा सुविधा निर्माण करून दिली. यामुळे ही रुग्णालय आरोग्यसेवेसाठी वरदान ठरणे आवश्यक होते. मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे रुग्णालयाचा कारभार कंत्राटी आणि शिकाऊ डॉक्टरांच्या भरवशावरच सुरू असून या ठिकाणी आलेल्या कायम डॉक्टरांची वारंवार गैरहजेरी ही नेहमीची बाब बनली असल्याचे रुग्णांनी सांगितले. काही वेळा आवश्यक डॉक्टर मिळत नसल्याने रुग्णांना उपचार न घेताच परतावे लागत आहे. तर दुसरीकडे येताना वेळ न पाळणारे कर्मचारी जाताना मात्र घड्याळाकडे बोट दाखवत काम संपल्याचे सांगत असल्याचेही अनेक रुग्णांनी सांगितले. तर स्वच्छतेचे लाखो रुपयाचे कंत्राट घेणाऱ्या ठेकेदाराचे तसेच या ठेकेदारावर नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांचे अर्थपूर्णरित्या दुर्लक्ष आहे की काय, असा सवाल रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांकडून उपस्थित केला जात आहे. याबाबत वैद्यकीय अधीक्षक यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी रजेवर असल्याचे सांगितले.


पाहणी दरम्यान दिसले की...
वॉर्डमध्ये अस्वच्छता
बेडवर बेडशीट नाही
काही रुग्णांनी घरूनच आणलेली स्वतःची सतरंजी बेडवर टाकत आपली व्यवस्था केली

हजेरी पत्रकावर मोठी रांग पण...
वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, नर्स, लॅब टेक्निशियन, कार्यालयीन कर्मचारी, औषध निर्माता, प्रयोगशाळा सहाय्यक, क्ष किरण, रक्तपेढी, आहार तज्ज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, शिपाई, वॉर्ड बॉय, सफाई कामगार, बाह्य रुग्णसेवक या कायम पदांसह अनेक शिकाऊ डॉक्टर तसेच कंत्राटी कर्मचारी यातील काही रिक्त पदे वगळता हजेरी पत्रकावर लांबलचक रांग पाहायला मिळते; मात्र प्रत्यक्षात रुग्णांच्या सेवेसाठी हाताच्या बोटावर मोजण्या इतपत कायम कर्मचारी पाहायला मिळाले अन्यथा रुग्णालयाचा सर्व कारभार हा नर्सिंग स्टाफवरच आढळला.

कर्मचारी अनुपस्थित
हजेरी पत्रकावरील काही कर्मचारी उपस्थिती दाखवून प्रत्यक्षात अनुपस्थित असल्याची माहिती समोर आली. काही स्वच्छता कर्मचारी मात्र, रुग्णालयात न येता अधिकाऱ्यांच्या घरांमध्ये काम करत असल्याचीही चर्चा रुग्णालय परिसरात होती.

06553

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com