विकास आघाडी स्वार्थासाठी नाही तर तुमच्या प्रवृत्तीच्या विरोधात
इंदापूर, ता. ३० : ही निवडणूक हर्षवर्धन पाटील यांची नाही तर ज्या प्रदीप गारटकर यांच्यावर अन्याय केला त्यांच्या नगराध्यक्षपदाची आहे. हो आम्ही आलो एकत्र, स्वार्थासाठी नाही तर तुमच्या प्रवृत्तीच्या विरोधात एकत्र आलो आहोत. अजित पवार दरवेळी इंदापूरमध्ये येऊन तुम्ही संस्थेबद्दल बोलता या तुम्हाला हिशोब दाखवतो, असे थेट आव्हान राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विरोधकांना दिले.
इंदापूर येथे नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने कृष्णा भीमा विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रदीप गारटकर व सर्व नगरसेवक यांच्या प्रचारार्थ विजय संकल्प निर्धार सभेत हर्षवर्धन पाटील बोलत होते.
प्रदीप गारटकर म्हणाले, इंदापूरमध्ये कृष्णा भीमा विकास आघाडीसाठी सर्वच राजकीय पक्ष एकत्र येऊ शकतात हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिले. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला राजकारणाचा अड्डा बनवायचा नाही तर ते सेवेचा माध्यम आहे. शहरातील रस्ते, विजेचे प्रश्न, वाढीव हद्दीत सुविधांचा अभाव आहे.तसेच नवीन शहर वाढत असताना जुनी बाजारपेठ रस्ता रुंदीकरण करणे, वाहनतळ उभा करणे, शहरासाठी रिंग रोड करणे, शहरातील तरुणांना रोजगार निर्माण करू अशी कामे करून शहराचा विकास करायचा आहे. तरंगवाडीचे शुद्ध पाणी इंदापूरकर देण्यास प्राधान्य देऊ, शहरात बगीचा, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सभागृह, धार्मिक सलोखा जपू, सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देऊ, चांगले योग भवन उभारू असे काम करून दाखवू. शहरातील वैद्यकीय व्यवस्थेबाबत उत्तम सुसज्ज हॉस्पिटल उभारून सेवा देऊ, नगराध्यक्ष सहायता कक्षाच्या माध्यमातून नागरिकांचा आरोग्य विमा काढू, समाजातील सर्व जाती धर्माच्या लोकांनाबरोबर घेऊन काम करू येणाऱ्या काळात सुसज्ज इंदापूर बनवू. प्रत्येक भागात वॉर्ड ऑफिस करून वॉर्डातच सेवा देण्याचे काम करू. छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान करू. यासाठी समाजाने ताकद द्यावी त्या माध्यमातून आदर्श इंदापूर उभा करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. हर्षवर्धन पाटील म्हणाले की, १९ वर्षे यांनी काय केले असे विचारता मग गेली ११ वर्षे तुम्ही ८६७ कोटी रुपये आणले म्हणता मग त्याचा काय विकास केला. नगरपालिकेच्या निवडणुकीला जर तुमचा ब्रँड चालत नसेल तर तुम्ही काय केले याचा विचार करा. शिरसोडी पूल व्यापाऱ्यांसाठी की कमिशनसाठी आहे.तालुक्यात एवढा निधी आणला तेवढा आणला हा निधी तुमच्या घरचा नाही जनतेच्या करातून आलेला पैसा आहे. कर्मयोगी कारखाना चालवायला दिला. हो तुम्हीच अडवणूक केली म्हणून शेतकऱ्यांना पैसे देण्यात अडचणी आल्या यामुळे कारखाना चालवायला दिला. तुम्ही जर यापुढे अशी टीका कराल तर यापुढे आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
दशरथ माने म्हणाले, गारटकर सर्व समाजालाबरोबर घेऊन जाणारे नेतृत्व आहे. विरोधकांवर बोलताना म्हणाले, विकास विकास काय विकास केला. त्या पुलाचे एवढे कौतुक झाले आहे. पण पूल स्वतःच्या कारखान्यासाठी केला. अशी सांगत कृषिमंत्री भरणे यांची नक्कल केली. यावेळी उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला. प्रवीण माने म्हणाले, स्वार्थासाठी नाही तर शहराच्या विकासासाठी एकत्र आलो आहोत. शहरातील प्रलंबित कामे, तरंगवाडी तलावातून शहरासाठी पिण्याचे पाणी देणे, शहरातील रस्ते आणि वाहतूक व्यवस्था सुधारणे, उपजिल्हा रुग्णाच्या सेवेचा बोजवारा उडाला आहे तो सुधारू, बाजारपेठेतील गैरसोयी दूर करू, स्मार्ट इंदापूर करू. यासाठी ही निवडणूक भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे म्हणून प्रदीप गारटकर यांच्या नेतृत्वाखाली कृष्णा भीमा विकास आघाडीच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. यावेळी माजी आमदार यशवंत माने यांच्यासह अन्य मान्यवरांनी मनोगते व्यक्त करीत कृष्णा भीमा विकास आघाडीच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.
आम्ही जात पात बघून राजकारण केले नाही. लोकप्रतिनिधी बद्दल बोलण्याची तर इच्छा नाही कारण ते योगायोगाने झालेले आमदार आणि मंत्री आहेत. संघटनेच्या जिवावर झालेले लोकप्रतिधींना संघटनेची किंमत नाही. पण राजकारण पेक्षा आम्ही समाजकारणाला प्राधान्य देणारे आहोत. आम्ही नसेल पैसे कमावले पण माणसे कमावली आहेत.यामुळे धनशक्ती विरोधी जनशक्तीचा विजय
होणार आहे.
- प्रदीप गारटकर, नगराध्यक्षपदाचे, उमेदवार, कृष्णा भीमा विकास आघाडी
6737
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

