इंदापूर शहर इतिहास, संस्कृती आणि परिवर्तनाचा साक्षीदार
संतोष आटोळे (इंदापूर)
पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेले इंदापूर हे शहर म्हणजे परंपरा, संघर्ष आणि परिवर्तन यांचा संगम आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आजोबा वीरश्री मालोजीराजे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या यासह प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांचे जन्मगाव म्हणून ओळखले जाणारे इंदापूर, ऐतिहासिक संदर्भ, धार्मिक स्थळे, स्वातंत्र्य चळवळीतील योगदान आणि उजनी धरणामुळे झालेले सामाजिक-आर्थिक बदल यांमुळे वेगळे ठरते.
इंदापूर हे पुणे जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाणी.ऐतिहासिक नोंदी नुसार पौराणिक काळात इंदापूरला ‘इंद्रप्रस्थ’ किंवा ‘इंद्रपुरी’ असे नाव होते.गावाचे ग्रामदैवत असलेले प्राचीन इंद्रेश्वर मंदिर आजही त्या इतिहासाची साक्ष देते. इतिहासामध्ये विजापूरचा पहिला बादशहा युसूफ आदिलशहाच्या ताब्यात असलेले हे गाव पुढे शहाजी राजांच्या मुलुखात समाविष्ट झाले. मराठा काळात इंदापूरला विशेष महत्त्व होते. अर्धवट बुरूज, वेसेचे भग्नावशेष आजही त्या वैभवशाली इतिहासाची आठवण करून देतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांना १६२० मध्ये इंदापूर येथेच विजापूरच्या आदिलशाही सैन्याशी लढताना वीरमरण आले. त्यांची छत्री व दगडी पादुका इंद्रेश्वर मंदिरात आजही पाहायला मिळतात. भोसले घराण्याच्या पराक्रमाचे पहिले स्मारक म्हणून इंदापूरचा इतिहासात विशेष उल्लेख होतो.
इंदापूर शहरात इंद्रेश्वर, श्रीराम, खंडोबा, दत्त, अशी अनेक प्राचीन मंदिरे आहेत. तसेच, तहसीलदार कचेरीजवळील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक हजरत चाँद शाह वली बाबा दर्गा आणि दरवर्षी तेथे होणारा उरुस हे शहराच्या धार्मिक सलोख्याचे प्रतीक आहे. सक्रोबाची मिरवणूक हे इंदापूरचे वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक रूप आहे. शहरातील श्री १००८ शांतिनाथ दिगंबर जैन मंदिर हे गेल्या दशकातील प्रमुख आकर्षण ठरले आहे. २०११मध्ये पूर्ण झालेल्या या मंदिरातील २७ फूट उंच मुनिसुव्रत भगवान यांची मूर्ती श्रवणबेळगोळ येथील प्रतिकृती असून राजस्थानी कलाकारांनी ती साकारली आहे. येथे रथोत्सव आणि महामस्तकाभिषेक मोठ्या उत्साहात साजरे होतात. परंपरेने अवर्षणग्रस्त असलेल्या इंदापूर तालुक्याला उजनी धरणामुळे नवसंजीवनी मिळाली. इंदापूरपासून अवघ्या १२ किलोमीटर अंतरावर असलेले उजनी हे जायकवाडीनंतरचे महाराष्ट्रातील दुसरे मोठे धरण आहे. बॅकवॉटरमुळे शेती बागायतीखाली आली, मासेमारी, पर्यटन, रिक्रिएशन क्लब यांसारख्या व्यवसायांना चालना मिळाली. हजारो देशी-विदेशी पक्ष्यांचे आगमन हे पर्यटनाचे वेगळे आकर्षण ठरले आहे. १८६५मध्ये स्थापन झालेली नगर परिषद, त्यानंतर चार महाविद्यालये, इंजिनिअरिंग कॉलेज, आयटीआय, न्यायालय, तहसील, सरकारी रुग्णालय, एसटी डेपो यांमुळे इंदापूर हे प्रशासकीय केंद्र आहे. शहरासह तालुक्याला अनेक स्वातंत्र्यसैनिक यांचा इतिहास आहे.नगरपालिकेच्या आवारातील स्वातंत्र्य सैनिक स्मृतिस्तंभ इंदापूरकरांच्या राष्ट्रप्रेमाची साक्ष देतो.
यासह सध्या उजनी धरण जलाशयामध्ये इंदापूर तालुक्यातील शिरसोडी ते करमाळा तालुक्यातील कुगाव असा पूल उभारणीचे काम जोमात सुरू झाले असून या पुलामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हे जोडले जाणार आहेत.यासाठी पुलाच्या मंजुरीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुप्रिया सुळे, कॅबिनेट मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी प्रयत्न केले तर यासाठी व्यापारी संघाचे अध्यक्ष व नूतन नगराध्यक्ष भरत शहा यांनी पाठपुरावा केला.या पुलामुळे इंदापूर सह करमाळा तालुक्याच्या विकासाला मिळणार चालना आहे. तसेच या भागातील अनेक गावे पर्यटन स्थळ म्हणून विकसित होणार आहेत. यामुळे उजनी धरण बॅक वॉटर वरील शिरसोडी ते कुगाव मार्ग हा इंदापूरच्या आर्थिक विकासाचा सेतू ठरणार आहे.
यासह शहरासह तालुक्यात झालेले कोट्यवधी रुपयांचे रस्ते, संत तुकाराम महाराज पालखी मार्ग, पुणे सोलापूर बाह्यवळण मार्ग, शहरातील मालोजी राजे गढी व हजरत चाँद शाह वली बाबा दर्गा या ऐतिहासिक वास्तूंचे सुशोभीकरण, नव्याने सुरू झालेले जिल्हा व सत्र न्यायालय, न्यायालयाची भव्य इमारत, प्रशासकीय भवन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे भव्य दिव्य कार्यालय, यासह अन्य उल्लेखनीय विकास कामांमुळे इंदापूर शहराचे रूप बदलत चालले असून शहराची विकसित शहराकडे वाटचाल सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

