‘मरावे परी अवयवरूपी उरावे’चा प्रत्यय
इंदापूर, ता. १३ : इंदापूर शहरातील ज्येष्ठ पत्रकार आणि आरोग्य संदेश बहुद्देशीय समाजसेवी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संदेश शहा यांच्या पत्नी आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्तव्यदक्ष व समाजभान जपणाऱ्या डॉ. राधिका संदेश शहा (वय ५५) यांचे मेंदू निकामी (ब्रेनस्ट्रोक) झाल्याने पुणे येथील खासगी रुग्णालयात सोमवारी (ता.१२) रात्री निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर अवयवदानाच्या माध्यमातून चौघांना नवे जीवन मिळाले आहे. शहा परिवाराने घेतलेल्या या निर्णयामुळे ‘मरावे परी अवयवरूपी उरावे’, याचा हृदयस्पर्शी प्रत्यय आला.
डॉ.राधिका शहा यांना गुरुवारी (ता. १) रात्री ब्रेन स्ट्रोक झाल्याने अचानक बेशुद्ध झाल्या. नंतर त्यांना प्रथमतः अकलूज आणि त्यानंतर पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुणे येथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया ही करण्यात आली; मात्र त्यांच्या तब्येतीत आवश्यक ती सुधारणा होत नव्हती. यावेळी संपूर्ण शहा परिवार आणि डॉ. राधिका शहा यांच्या इच्छेनुसार आणि अत्यंत दुःखद प्रसंगाला सामोरे जात असतानाही सामाजिक बांधिलकीचे भान राखत शहा परिवाराने मोठ्या हिमतीने अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यांनी मरणोत्तर नेत्र, हृदय, किडनी व लिव्हर दान केले. या अवयवदानामुळे गरजू रुग्णांना नवसंजीवनी मिळणार असून, त्यांच्या जीवनाचा दीप पुन्हा उजळणार आहे. दरम्यान, डॉ. राधिका शहा यांच्या पश्चात आई, सासू, पती, दोन मुली व मुलगा, दीर, जाऊ, दोन पुतणे, एक पुतणी असा परिवार आहे. ‘‘डॉ.राधिका शहा यांच्या “देहाने जरी जगाचा निरोप घेतला असला, तरी अवयवदानाच्या माध्यमातून त्या श्वासात, नजरेत आणि हृदयात जिवंत राहतील,’’ अशी भावना डॉ. संदेश शहा यांनी व्यक्त केली.
डॉ.राधिका शहा यांचे सामाजिक कार्य
डॉ. राधिका शहा यांनी ‘सकाळ रिलिफ फंडा’च्या माध्यमातून ‘तनिष्का’ महिलांची चळवळ उभा करत रोटरी क्लबच्या मदतीने इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी, गोखळी, विठ्ठलवाडी ही तीन गावे टँकर मुक्त करण्यासाठी जलसंधारणाची कामे केली. ‘सकाळ मधुरांगण’, ‘तनिष्का’ व्यासपीठाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून महिला सक्षमीकरण यासह केंद्र सरकारच्या शेतकरी कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना गट शेतीचे प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र संचालिका म्हणून योगदान दिले. त्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात वैष्णवांच्या आरोग्याची तपासणी करून मोफत होमिओपॅथिक औषधांचे वाटप दरवर्षी करत तसेच विविध शाळा महाविद्यालय येथे आरोग्य धनसंपदा या विषयावर शेकडो व्याख्याने दिली. कोरोना काळात आरोग्य सेवा, इंदापूर येथील श्री १००८ शांतिनाथ दिगंबर जैन मंदिर उभारणीमध्ये सहभाग, नेहरू युवा केंद्राच्या गणेशवाडी येथील तूर खरेदी केंद्र, पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण, युवापिढीसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आदी विविध उपक्रम राबविण्यासाठी त्यांनी योगदान दिले.
6930
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

