इंदापुरात राष्ट्रवादीतील नाराजांना भाजपचे बळ
इंदापूर, ता. २१ : इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक रणधुमाळीत एकमेकांचे पारंपारिक विरोधक असलेले कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे एकत्र आले आहेत. त्यांच्या उमेदवारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ‘घड्याळ’ चिन्हावर अर्ज दाखल केले आहेत. तर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने आणि प्रदीप गारटकर यांच्या माध्यमातून भाजपने राष्ट्रवादी दोन्ही गटातील नाराजांना बरोबर घेत ‘कमळ’ चिन्हाच्या माध्यमातून उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे इंदापूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप, अशी लढत राहणार आहे.
इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आठ जागा आणि पंचायत समितीच्या १६ जागांसाठी शहरातील प्रशासकीय भवन येथे बुधवार(ता. २१) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी जत्रेचे स्वरूप आले होते. यावेळी राष्ट्रवादी व भाजपच्या उमेदवारांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनेही जिल्हा परिषदेचे सहा व पंचायत समितीचे सहा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. अनेक अपक्षांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
दत्तात्रेय भरणे आणि हर्षवर्धन पाटील हे आपले जुने मतभेद बाजूला ठेवत राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली आणि ‘घड्याळ’ या एकाच चिन्हावर एकत्र आले आहेत. या अनपेक्षित राजकीय घडामोडीमुळे अनेक इच्छुक कार्यकर्त्यांना आपल्या इच्छा आकांक्षावर पाणी सोडावे लागले. उमेदवारी नाकारलेल्यांमध्ये तीव्र नाराजीचा फायदा भाजपने घेत त्यांना उमेदवारी दिली. तर काहींनी आपल्या भूमिका गुपितच ठेवल्या आहेत.
दरम्यान, भाजपनेही या निवडणुकीच्या निमित्ताने आपली संपूर्ण ताकद लावली आहे. यामध्ये सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने, नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले प्रदीप गारटकर, प्रवीण माने, माजी आमदार यशवंत माने यांच्यासह भाजपचे पदाधिकारी सर्व जागा ताकदीने लढवण्याच्या तयारीत उतरले आहेत. एकत्र आलेली राष्ट्रवादीची ताकद आणि सज्ज झालेली भाजपची फौज यामुळे इंदापूर तालुक्यातील निवडणूक प्रतिष्ठेची आणि वर्चस्वाची लढाई ठरणार आहे.
नेत्यांच्या दुसऱ्या फळीला संधी
इंदापूर तालुक्यात या निवडणुकीच्या निमित्ताने नेत्यांनी आपल्या पुढच्या पिढीला राजकारणात आणले. यामध्ये हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांनी पुन्हा यापूर्वीच्याच बावडा- लुमेवाडी जिल्हा परिषद गटातून घड्याळ चिन्हावर अर्ज भरला, तर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अप्पासाहेब जगदाळे यांचे चिरंजीव यशराज यांनी वडापुरी- माळवाडी गटातून; तर कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज यांनी पंचायत समितीसाठी बोरी गणातून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
प्रशासकीय नियोजनाचा अभाव
अर्ज दाखल करण्यास शेवटच्या दिवशी प्रचंड गर्दी होईल, याची प्रशासनाला जाणीव असतानाही याबाबत अधिक चांगल्या पद्धतीने नियोजन करणे आवश्यक होते. नियमाप्रमाणे अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे मोजकेच उमेदवार किंवा प्रतिनिधी जाणे आवश्यक असताना नियम पाडळी तुडवत तहसीलदारांच्या कार्यालयातच गर्दी, गोंगाट पाहायला मिळाला. त्यामुळे अनेक उमेदवारांना आत बाहेर जाण्यासाठीही अडचणींचा सामना करावा लागला. शेवटचा काही वेळ शिल्लक असताना ही परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे प्रशासनाच्या कामकाजाबाबत अनेक उमेदवार, नागरिक यांनी नाराजी व्यक्त केली.
इंदापूर : प्रशासकीय भवन येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने अर्ज भरण्यासाठी आलेले जत्रेचे स्वरूप.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

