बाजारपेठ बंद ठेवत इंदापुरातून हळहळ व्यक्त

बाजारपेठ बंद ठेवत इंदापुरातून हळहळ व्यक्त

Published on

इंदापूर, ता. २८ : ‘बारामतीनंतर माझा सर्वात जास्त प्रेम असलेला तालुका म्हणजे इंदापूर’, अशी प्रत्येक भाषणात ग्वाही देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने इंदापूर शहरासह तालुक्यात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. महाराष्ट्राने विकासाभिमुख नेतृत्व गमावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच शहरातील सर्व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बाजारपेठ बंद ठेवत आपले दुःख व्यक्त केले. निधनाची वार्ता समजताच इंदापूर शहरासह ग्रामीण भागातील अनेकांचा विश्वासच बसत नव्हता. सर्वजण एकमेकांशी संपर्क करत होते आणि बातमीची खात्री झाल्यानंतर तत्काळ शहरातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बाजारपेठ बंद ठेवत हळहळ व्यक्त केली. तसेच, सर्वसामान्य नागरिकांसह, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, सर्वच राजकीय पक्षांचे आजी- माजी पदाधिकारी यांनी बारामतीच्या दिशेने कूच केली.

बारामतीच्या बरोबरीने इंदापूर शहर व तालुक्याचा विकास व्हावा, असे त्यांचे स्वप्न होते. इंदापूर तालुक्याला त्यांनी समर्थ राजकीय नेतृत्व, ताकद देण्याचा नेहेमीच प्रयत्न केला. त्यामुळे इंदापूर शहर व तालुक्याच्या विकासासाठी निधी देताना त्यांनी कधी ही हात आखडता घेतला नाही. बारामतीत जे- जे आहे, ते इंदापूरमध्ये ही असावे, असा त्यांचा आग्रह होता. त्यांनी इंदापुरात ही विद्या प्रतिष्ठानची शाखा आणली. इंदापूर व्यापारी संघटनेचे पत्र मिळाले त्याच दिवशी उजनी पाणलोट क्षेत्रात पूल बांधण्यासाठी निधी देण्याची घोषणा करणे व लगतच्या काळात कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद करणे हे काम फक्त अजित पवारच करू शकतात, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.

गोकुळदासभाई शहा यांचे निधन झाल्यानंतर अजितदादांनी आमच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. त्या भेटीत आमच्याशी बोलणारे राजकीय अजितदादा नव्हते. एक थोरला भाऊच आपली संवेदना व्यक्त करत आहे. माझ्याशी व कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याशी दादा बोलले. त्यानुसार आम्ही नगरपरिषदेचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहोत. मात्र, तो पहाण्यासाठी अजितदादा शरीराने आमच्यासमवेत नसतील, ही खंत मात्र आयुष्यभरासाठी राहणार आहे, अशी भावना इंदापूरचे नगराध्यक्ष भरत शहा यांनीव्यक्त केली.

नियोजित प्रचार दौरे रद्द
झेडपी व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच पक्षांनी आखलेले सर्व नियोजित दौरे प्रचार सभा घोंगडी बैठका नेत्यांनी रद्द केल्या. शिवाय पवार यांच्या दुःखद निधनाच्या बातमीने त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पवार यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत आपल्या दुःखद भावनांना वाट मोकळी करून दिली.

07018

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com