पालखी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच

पालखी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच

Published on

इंदापूर, ता. ४ ः जगद्‍गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील बारामती- निमगाव केतकी ते इंदापूर दरम्यानच्या मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याची कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. तसेच, प्रशासन आणि ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे सूचनाफलक व सुरक्षाव्यवस्थेचा अभाव असल्याने वारंवार अपघात होत आहेत. यामुळे अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर तरंगवाडी (ता. इंदापूर) हद्दीत वेताळ मंदिरालगत रास्ता रोको आंदोलन करीत अपघात मृत्यू प्रकरणी प्रशासनाने संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार अविनाश डोईफोडे साहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन मोहिते यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद केल्यानुसार, पालखी महामार्गावर भागात वेगाने कामे पूर्ण झाली. मात्र, बारामती ते इंदापूर हे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने, तसेच अपूर्ण कामाच्या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्याने अनेक ठिकाणी ‘अपघात स्पॉट’ तयार झाले आहेत. यामध्ये रस्त्याचे अपूर्ण काम, बाजूला उघडी खडी- माती, रात्री पुरेशा प्रकाशयोजनेचा अभाव आणि इशारा फलक नसल्यामुळे अनेक गंभीर अपघात घडले आहेत. निमगाव केतकी ते इंदापूर या अपूर्ण अवस्थेतील पालखी मार्गावर आतापर्यंत शेकडो अपघात झाले असून, यामध्ये सुमारे २५ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा आंदोलनकर्त्या ग्रामस्थांनी केला. तसेच, वारंवार तक्रारी करूनही संबंधित ठेकेदार व प्रशासनाने ठोस उपाययोजना न केल्याचा आरोप करत स्थानिक ग्रामस्थांनी काही काळ रस्ता रोको आंदोलन करीत प्रशासन व ठेकेदाराचा निषेध व्यक्त करीत अपूर्ण कामांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, रस्ता रोको बाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती सुरळीत केली. याबाबत संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे प्रकल्प अधिकारी प्रमोद घोडके यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.

वारंवार तक्रारी करूनही संबंधित ठेकेदार व प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नाही. त्यामुळेच संतप्त ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करून प्रशासन आणि ठेकेदार यांचा निषेध व्यक्त केला. अपूर्ण कामे तत्काळ पूर्ण करावीत, अपघातग्रस्तांना न्याय द्यावा आणि संबंधित ठेकेदार व जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत.
डॉ. शशिकांत तरंगे, राज्य प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस

निमगाव केतकी ते इंदापूर दरम्यान वेताळ मंदिर परिसरात राष्ट्रीय महामार्गावर मातीचा ढिगारा, तसेच अपूर्ण कामे व निकृष्ट दर्जाचे सूचनाफलक यामुळे रात्रीच्या वेळी वारंवार अपघात होत आहेत. आतापर्यंत या भागात झालेल्या अपघातात पंचवीसहून अधिक नागरिकांचा जीव गेला. यामुळे याबाबत अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात.
- बाळासाहेब ढवळे, उपनगराध्यक्ष, इंदापूर

मंगळवारी रात्री अपघातात परप्रांतीय युवकाचा मृत्यू
मंगळवारी (ता. ३) रात्री ८ वाजताच्या दरम्यान पालखी मार्गावरील तरंगवाडी येथील वेताळ मंदिराजवळ रस्ता कामाचा अंदाज न आल्याने दुचाकी क्रमांक (एमएच ४७ पी ९०२०) अपघात झाला. यामध्ये संदीपकुमार इंदल राम (सध्या रा. सोनाई डेअरी जवळ, मूळ बिहार) या २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. याच ठिकाणी यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत.

07173

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com