माळवाडीत क्षारयुक्त जमिनीतही बहरला गहू

माळवाडीत क्षारयुक्त जमिनीतही बहरला गहू
Published on

इंदापूर, ता. ४ : माळवाडी (ता. इंदापूर) येथील प्रगतशील शेतकरी महादेव बोराटे यांनी खाऱ्या जमिनीत गहू लागवड केली. दोन एकरात तब्बल ५१ क्विंटल उत्पादन घेण्याची किमया साधली आहे. क्षारयुक्त जमिनीतही योग्य वाण व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास भरघोस उत्पादन मिळू शकते, हे त्यांनी आपल्या प्रयोगातून सिद्ध केले आहे.
बोराटे यांनी केआरएल-२१० या क्षार-सहिष्णु गव्हाच्या वाणाची निवड केली. हा वाण आयसीएआर-सीएसएसआरआय संस्थेने विशेषतः खारट जमिनींसाठी विकसित केला असून, अशा जमिनीतही उत्पादन क्षमता चांगली राहते.
सामान्यतः खाऱ्या जमिनीत गव्हाचे उत्पादन कमी येते, असा समज असताना बोराटे यांनी हा समज खोटा ठरवला. त्यांनी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पेरणी करून नियोजनबद्ध पद्धतीने शेती केली.

शून्य मशागत व आधुनिक तंत्रांचा वापर
या प्रयोगात महादेव बोराटे यांनी पारंपरिक नांगरणी न करता शून्य मशागत पद्धतीचा अवलंब केला. बियाणे-सह-खत पेरणी यंत्राचा वापर करून कमी खर्चात अचूक पेरणी केली. इतर वाणांसाठी प्रति हेक्टर सुमारे १०० किलो बियाणे लागते, तर बोराटे यांनी केवळ ८० किलो बियाण्यात लागवड केली.

पाण्याची मोठ्या प्रमाणावर बचत
महादेव बोराटे यांनी खत व्यवस्थापन काटेकोर करीत पिकाला आवश्यक पोषण दिले आणि खर्चातही बचत झाली. जलव्यवस्थापनातही त्यांनी कौशल्य दाखवत पारंपरिक गव्हासाठी लागणाऱ्या ३ ते ४ पाण्यांच्या ऐवजी केवळ २ ते ३ सिंचनांमध्ये पीक घेतले, ज्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावर बचत झाली.


07328

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com