पांडेश्वरमध्ये आढळला चौदाव्यात शतकातील शिलालेख
जेजुरी, ता. १८ : पुरंदर तालुक्यातील पांडेश्वर व आंबी गावांच्या हद्दीलगत शेतात जुन्या मराठी भाषेत असणारा एक शिलालेख आढळून आला आहे. चौदाव्या शतकाच्या आसपासचा हा शिलालेख असल्यामुळे त्या काळातील काही माहीती उपलब्ध होताना दिसत आहे. सध्याचे ‘पांडेश्वर’ त्याकाळात ‘पांडवेश्वर’ नावाने असल्याची नोंद या शिलालेखावरून समजते. शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले पुरंदर तालुक्यातील पांडेश्वर येथील महादेवाच्या मंदिराजवळच पांडेश्वर आणि आंबी गावांच्या हद्दीलगत तेथील ग्रामस्थ कुदळे यांच्या शेतात जुन्या मराठी भाषेत असणारा एक शिलालेख आढळून आला आहे. या शिलालेखाचे वाचन पुण्यातील इतिहास अभ्यासक अनिल दुधाणे आणि अथर्व पिंगळे यांनी केले. शिलालेखाचा शोध घेण्याच्या कामात त्यांना स्थानिक रहिवासी महेंद्र नवले आणि खलील शेख यांची मदत झाली. अक्षरवटिकेवरून शिलालेखाचा काळ साधारणतः चौदावे शतक असा ठरतो. त्यावरून तो यादव साम्राज्याच्या अस्तानंतरच्या काळातील असण्याची सर्वाधिक शक्यता आहे.
शिलालेखात काय आहे?
या शिलालेखात पांडेश्वर देवस्थानातील महादेवाच्या पिंडीची देखभाल आणि स्नानादी विधी करण्यासाठीची वृत्ति (दान) दिल्याचा उल्लेख आहे. हे दान किती रकमेचे होते किंवा भूमिदान होते किंवा काय, यासंबधीचे तपशील शिलालेखाच्या वाचनीय भागात तरी आढळत नाहीत. मजकुराच्या शेवटी शिलाशासन नष्ट करणाऱ्यासाठी शापवचन आले असून, त्याखाली गधेगाळीची आकृति कोरलेली आहे. पांडेश्वराचे मूळ नाव ‘पांडवेश्वर’ असे असल्याची माहिती शिलालेखातून मिळते. शिलालेखात कोणत्याही शासकाच्या नावाचा उल्लेख आलेला नाही. त्यावरून स्थानिक भक्तांनी अथवा ग्रामसभेनेच सर्वसंमतीने हे दान मंजूर केले असावे, असे दिसते.
यादवोत्तर काळात पुणे जिल्ह्यातील जुन्नर, तसेच चाकण ही ठिकाणे राजकीयदृष्ट्या महत्वाची राहिली. येथील पुरंदर, सिंहगड आणि लोहगड अशा किल्ल्यांनाही बरेच महत्व होते. त्यामुळे जिल्ह्यात दिल्ली सल्तनत आणि बहमनी राजवटीच्या काळातील मराठी शिलालेख उपलब्ध आहेत. या शिलालेखांचा समग्र अभ्यास करण्याचे काम आम्ही करत आहोत.
- अथर्व पिंगळे
जवळार्जुन व पांडेश्वरच्या शिलालेखात साम्य
पांडेश्वराच्या मंदिरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या जवळार्जुन गावातही जुन्या मराठीतील एक शिलालेख असून, तो सन १३४७ मधील म्हणजेच बहमनी राजवटीच्या प्रारंभिक काळातील आहे. त्यामधील अक्षरांचे वळण पांडेश्वर येथील शिलालेखाशी मिळतेजुळते आहे. त्यातील माहितीशी असणारे साधर्म्य पाहता पांडेश्वरचा शिलालेखही त्याच्या
निकटच्या काळातील अर्थात् सन १३३० नंतरचा असावा. जवळार्जुन शिलालेखाचे वाचनही लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहीती अनिल दुधाणे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

