जेजुरीच्या पाणी योजनेला सापडेना मुहूर्त
जेजुरी, ता. ४ ः तिर्थक्षेत्र जेजुरीसाठी (ता. पुरंदर) वीर जलाशयावरून नवीन पाणी योजना मंजूर झाली. तिची निविदाही मंजूर झाली. मात्र, गेले १० महिन्यांपासून या योजनेला मुहूर्तच सापडेना. यामुळे जेजुरीत तीन ते चार दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. याबाबत तातडीने कार्यवाही व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
जेजुरीसाठी सध्या नाझरे जलाशय आणि मांडकी डोह येथून पाणी पुरवठ्याच्या दोन योजना आहेत. मात्र, या दोन्ही योजना जुन्या आहेत. त्या पुरेशा ठरत नाहीत. नाझरे धरणावरून असणाऱ्या योजना खूप पूर्वीची सन १९७५ सालची आहे. वाढत्या जेजुरीच्या लोकसंख्येला त्यातून पाणी मिळत नाही. मांडकी डोहावरील योजना निकृष्ट कामामुळे सतत बंदच असते.
उन्हाळ्यात या योजनेतून शहराला पाणी पुरवठा कारणे जिकिरीचे बनते. पुरेसे पाणी असतानाही जेजुरीकरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई सध्या जाणवत आहे.
जेजुरीची पाणी टंचाई सोडविण्यासाठी वीर धरणावरून कायमस्वरूपी योजना राबविण्यास शासनाने प्रयत्न सुरू केले. नवीन योजनेच्या मंजुरीची निविदा प्रसिद्ध केली. मात्र, गेल्या १० महिन्यांपासून या योजनेचे काम सुरू होऊ शकले नाही. याबाबत माजी नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांनी लवकरात लवकर योजना सुरू व्हावी, अशी मागणी केली आहे. शहराला नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी सन २०१८ मध्ये वीर जलाशयावरून पाणी पुरवठा योजना करण्यासाठी शासनाच्या नगरविकास विभागाकडे मागणी केली होती. यानंतर माजी आमदार संजय जगताप यांनी ही योजना मंजुरीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला. दरम्यानच्या काळात योजनेचा सुमारे ६६ कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला. याशिवाय योजनेसाठी वीर जलाशयातून १.४७३२ दशलक्ष घन मिटर पाणी उचलण्याची मान्यता ही घेण्यात आली. या योजनेला ५ सप्टेंबर २०२४ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली. प्रशासकीय मान्यतेनंतर २६ सप्टेंबर २०२४ रोजी निविदा प्रक्रिया सुरू झाली. निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत ही १० ऑक्टोबर २०२४ संपणार होती. या दरम्यान १० निविदामधून पाच जणांच्या निविदा योजना पूर्ण करण्यासाठी पात्र झाल्या होत्या. यातील संतोष कॅन्स्टक्शन प्रा. लि. या कंपनीची ५९ कोटी ६० लक्ष ४६ हजार २४३ रुपयांची निविदा मंजूर झाली. नंतर विधानसभा निवडणूक आचार संहिता आणि निवडणूक यामुळे
योजनेबाबत काहीच हालचाली झाल्या नाहीत. अद्यापही जैसे थे परिस्थिती आहे. त्यामुळे पाणी असूनही नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे, असे माजी नगराध्यक्षा विना सोनवणे यांनी सांगितले.
ठेकेदाराला अनामत रक्कम भरण्याबाबत सूचना
या संदर्भात जेजुरी नगरपालिकेचे पाणी पुरवठा अभियंता नागनाथ बिराजदार यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिलेली नाही. मात्र, दोन दिवसांपूर्वीच अनामत रक्कम भरण्याबाबत सूचना दिली असल्याचे सांगितले आहे.
नव्या योजनेमुळे पाणीपुरवठा होणार सुरळीत
वीर धरणावरून नव्याने राबविण्यात येणाऱ्या योजनेत जेजुरी शहरांतर्गत ३४ किलोमीटरची जलवाहिनी नव्याने फिरविण्यात येणार आहे. या शिवाय दोन पाण्याच्या टाक्याही बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे जेजुरीचा पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे. उच्च दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. जेजुरी हे तीर्थक्षेत्राचे ठिकाण असल्याने येथे भाविकांच्या पाण्याची सोयही नगरपालिका व देवसंस्थानला करावी लागते. त्यामुळे वीरच्या योजनेकडे जेजुरीकरांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.