भाजपपुढे इतर पक्षांच्या आघाडीचे आव्हान

भाजपपुढे इतर पक्षांच्या आघाडीचे आव्हान

Published on

भाजपपुढे इतर पक्षांच्या आघाडीचे आव्हान

जेजुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचे इतर पक्षांसमोर आव्हान असणार आहे. शिवसेनेचे दोन गट, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन गट, कॉंग्रेस आदी पक्ष एकत्र येऊन लढणार की, स्वतंत्र लढणार, यावर लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, सध्या तरी नगराध्यक्षपदासाठी अनेक इच्छुक चाचपणी करीत आहेत.

- तानाजी झगडे, जेजुरी

पुरंदर तालुक्यातील जेजुरी नगरपालिका निवडणुकीत नेहमीपेक्षा यावेळी वेगळी निवडणूक असणार आहे. सध्या अनेक समीकरणे बदलली आहेत. यापूर्वी दुय्यम असलेल्या भाजपची माजी आमदार संजय जगताप यांच्या पक्षप्रवेशामुळे यावेळी ताकद वाढली आहे. त्यामुळे भाजपचे इतर पक्षांपुढे मोठे आव्हान असणार आहे. भाजपच्या विरोधात इतर पक्ष एकत्र येणार का स्वतंत्र लढणार, यावर बरीच समीकरणे अवलंबून आहेत. सध्या तरी भाजप विरुद्ध इतर पक्षांची आघाडी, अशी चर्चा सुरु आहे. त्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जेजुरी नगरपालिकेत आठ वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस, अशी लढत झाली होती. त्यावेळी कॉंग्रेसचे नगराध्यक्षासह दहा नगरसेवक, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सात नगरसेवक निवडून आले होते. त्याच्यापूर्वी पालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसची अनेक वर्षे सत्ता होती. मागील काही वर्षांच्या निवडणुकीत बारभाई व सोनवणे व दरेकर या गटांकडे आलटून पालटून नगराध्यक्षपद राहिले असल्याचा इतिहास आहे. परंतु, आता समीकरणे बदलली आहेत. पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविली जात आहे. पक्षीय समीकरणेही बदलली आहेत.
मागील निवडणुकीत सत्तेत असणारे कॉंग्रेसचे नगरसेवक सध्या भाजपमध्ये आहेत. माजी आमदार संजय जगताप यांच्या भाजप प्रवेशानंतर येथील नगरसेवकही त्यांच्याबरोबर भाजपात गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे येथील भाजपची ताकद वाढली आहे. मात्र, विरोधक हे सध्या त्याच पक्षात आहेत. विरोधक असलेल्या राष्ट्रवादी व शिवसेनेचे दोन गट झाले असले तरी निवडणूक ते एकत्र येऊ शकतात. भाजपचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे, अशी स्थिती आहे. त्यात शिवसेनेची (शिंदे) भूमिका काय राहणार, याकडेही सर्वांचे लक्ष आहे. त्यात मनसे, रिपब्लिकन पक्ष, संभाजी ब्रिगेड यांचीही भूमिका महत्त्वाची आहे.

नराध्यक्षपदासाठी भाजपकडून सचिन सोनवणे, अजिंक्य देशमुख, सुधीर गोडसे, सचिन पेशवे हे पदाधिकारी इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून जयदीप बारभाई इच्छुक असल्याचे समजते. मात्र, वरिष्ठ पातळीवरील घडामोडींकडे लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेकडून विठ्ठल सोनवणे, संभाजी ब्रिगडचे अध्यक्ष संदीप जगताप, मनसेकडून तालुकाध्यक्ष उमेश जगताप इच्छुक आहेत. नगरसेवकपदासाठी सर्वच वॉर्डांमधून इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामध्ये आजी- माजी नगरसेवकांचा समावेश आहे. पालिकेचे मतदान वाढल्याने इच्छुक उमेदवारांची आकडेमोड सध्या सुरु आहे. मागील काही नगरसेवक नव्याने संधी शोधत आहेत.

भाजप प्रवेशाने बदलली समीकरणे
कॉंग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी लढत मागील काळात अनेक वेळा झाली होती. मागील निवडणुकीत कॉंग्रेसच्या विना सोनवणे या नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या होत्या. त्यात कॉंग्रेसचे दहा, तर सात नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे होते. संजय जगताप यांनी कॉंग्रेस सोडून भाजप प्रवेश केल्याने विद्यमान नगरसेवकही त्यांच्या समवेत आहेत. त्यामुळे आता भाजप विरुद्ध इतर सर्व पक्ष की इतर सर्वच पक्ष स्वतंत्र लढणार, याबाबत तर्कवितर्क सुरु आहेत. दोन पॅनेलमध्ये लढत झाल्यास अटीतटीची लढती होणार, हे मात्र निश्चित आहे. भाजप मित्र पक्षांना जवळ घेणार का, यावरही बरीच गणिते अवलंबून आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com