
गढ्या, वाड्यांना राज्याच्या सांस्कृतिक धोरणात समावेश करण्याची मागणी
जुन्नर, ता. १२ : ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी ऐतिहासिक गढ्या, वाडे जतन संवर्धन योजनेचा समावेश राज्याच्या सांस्कृतिक धोरणात करावा अशी मागणी सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेने केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सांस्कृतिक धोरण समितीचे कार्याध्यक्ष डॉ.विनय सहस्रबुद्धे यांना संस्थेने याबाबतचे निवेदन दिले आहे.
महाराष्ट्राला ऐतिहासिक वाड्यांचा वास्तुशैलीचा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. मात्र झपाट्याने होणाऱ्या शहरीकरणामुळे अनेक लहान मोठे प्राचीन खासगी वाडे जमीनदोस्त होऊन वाडा संस्कृती नाहीशी होत आहे. अनेक वारसा प्रेमी वाड्यांच्या अवशेषांचे जतन करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांचे प्रयत्न तोकडे पडत आहेत. या वाडा संस्कृतीच्या जतन संवर्धन आणि त्याद्वारे पर्यटनाला चालना देण्यासाठी योजना आखण्याची गरज असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
ऐतिहासिक गढ्या, वाडे जतन संवर्धन योजनेसाठी पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड, आंबेगाव आणि शिरूर या चार तालुक्यातील वाड्यांचे सर्वेक्षण जिल्हा परिषद, ग्रामपंचायत आणि नगरपालिका स्तरावर करून, योजना आखणीसाठी नगरविकास, ग्रामविकास, पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे समिती स्थापन करावी अशी मागणी निवेदनात केली आहे.
आपल्यापैकी अनेकांच्या आठवणी जुने वाडे तसेच गढीशी निगडित आहेत. अनेक घटनांचे साक्षीदार असणारे वाडे-गढी जेव्हा पडतात तेव्हा केवळ ती वास्तू पडत नाही तर मनामध्ये कुठेतरी घर करून बसलेल्या गढी-वाड्याच्या आठवणींना धक्का लागतो. काही वर्षात कदाचित वाडा-गढी काय असते हे पाहायला मिळणे अवघड होईल. इतिहासाच्या पानावर एक समृद्ध वास्तू रचनेचा उत्तम प्रकार म्हणून गढी तसेच वाड्याचा इतिहास नक्की लिहिला जाईल.
-बापूजी ताम्हाणे, जुन्नर इतिहास अभ्यासक.