‘एसईबीसी’ प्रमाणपत्राअभावी मराठा तरुणांची अडचण

‘एसईबीसी’ प्रमाणपत्राअभावी मराठा तरुणांची अडचण

जुन्नर, ता. ४ : ‘एसईबीसी’ प्रमाणपत्रासाठीचा नवीन शासन निर्णय व अर्ज शासनाकडून महाऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध नसल्याने मराठा मुले पोलिस भरतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठा तरुणांना ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र वितरित करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याची मागणी सकल मराठा समाजाचे समन्वयक प्रमोद खांडगे पाटील यांनी केली आहे.

आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्या मराठा तरुण, तरुणींना शैक्षणिक व नोकरीत दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाला आहे. पोलिस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शासनाने १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र यापुढील काळात येणाऱ्या शासकीय सुट्टीचे दिवस पाहता प्रत्यक्ष कामकाजासाठी चार ते पाच दिवस मिळत असल्याने इतक्या कमी कालावधीत दाखले कसे मिळणार, याची इच्छुक उमेदवारांना चिंता भेडसावत आहे. जुन्नर तालुका सकल मराठा क्रांती मोर्चाचे सदस्य योगेश तोडकर, अनिल गावडे, सचिन थोरवे यांनी प्रशासनाने याबाबत गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे.

तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्याशी खांडगे पाटील यांनी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘महापोर्टलवर प्रमाणपत्र अपलोड करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. परंतु यासाठी काही कालावधी लागू शकतो. मराठा तरुणांना ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल.’’

‘एसईबीसी’ प्रमाणपत्रासाठी सुरुवातीला तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. मराठा तरुणांना ‘एसईबीसी’चा दाखला वेळेत मिळावा यासाठी प्रशासनाने नियोजन करावे. नोकर भरती व शासकीय योजनांसाठी लागणारे दाखले लाभार्थींना तत्काळ मिळावेत, अशी मागणी सकल मराठा समाजाचे संदेश बारवे यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com