विघ्नहर कारखान्याचे ऊस लागवड धोरण जाहीर

विघ्नहर कारखान्याचे ऊस लागवड धोरण जाहीर

जुन्नर, ता. २३ : आगामी गळीत हंगामासाठी पुरेसा ऊस उपलब्ध होण्यासाठी येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे ऊस लागवडीचे धोरण १ जूनपासून राबविण्याचे संचालक मंडळाच्या बैठकीत निश्चित करण्यात आले असल्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी सांगितले.
शेरकर म्हणाले, ‘‘आडसाली ऊस लागवडीसाठी १ जून ते ३१ ऑगस्टपर्यंतच्या कालावधीत को.८६०३२, को. एम.०२६५ या ऊस जातीच्या लागवडीस परवानगी देण्यात आली. पूर्वहंगामी लागवडीसाठी १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंतच्या कालावधीत को. ८६०३२, को. एम. ०२६५, को. व्हीएसआय-१८१२१, व्हीएसआय-०८००५ व पीडीएन-१५०१२ या ऊस जातींची लागवड करावी. सुरु हंगामासाठी १ डिसेंबरपासून को- ८६०३२, कोव्हिएसआय-१८१२१, पीडीएन-१५०१२, को-९०५७ व व्हीएसआय-०८००५ या ऊस जातींच्या लागवडीस परवानगी दिली आहे. डिसेंबर महिन्यात कोएम-०२६५ या ऊस जातीच्या लागवडीस परवानगी दिली. त्यानुसार कारखाना कार्यक्षेत्रामध्ये सर्व सभासद व ऊस उत्पादकांना १ जूनपासून वरीलप्रमाणे ऊस जातीचे बेणे वाटप करण्यात येणार आहे.’’
ऊस विकास अभियानांतर्गत ऊस उत्पादकांना उधारी तत्त्वावर ऊस बेणे व ऊस रोपांचा पुरवठा केला जातो. ऊस लागवड व कारखान्यांकडे ऊसनोंद झाल्यावर प्रति एकरी ऊस उत्पादन वाढीसाठी प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. जमिनीतील अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होऊन रासायनिक खतांची मात्रा कमी होण्यासाठी जिवाणू खतांचा पुरवठा केला जातो. जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी हिरवळीच्या खतांसाठी ताग बियाणेचा पुरवठा केला जातो. पाण्याची व रासायनिक खतांची बचत करून अधिकचे उत्पादन घेण्यासाठी कारखान्यामार्फत ठिबक सिंचन योजना राबविण्यात येत असल्याचे शेरकर यांनी सांगितले.
कारखान्यामार्फत लागवड हंगाम २००३ पासून हुमणी किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकरी व मजुरांकडून रोख रक्कम देऊन हुमणी किडीचे भुंगेरे गोळा करून कारखाना गट ऑफिसला जमा करून कारखाना साइटवर नष्ट केले जातात. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी लागवड हंगामात २५ मे ते ३० जून २४ या कालावधीत हुमणीचे भुंगेरे गोळा करून कारखाना गट ऑफिसला जमा करावेत, असे सांगण्यात आले.
ऊस उत्पादक पुरुष व महिलांना उसाचे नवीन संशोधित तंत्रज्ञान व ऊस पिकांमध्ये यांत्रिकीकरणाच्या वापराची माहिती व्हावी, यासाठी व्हीएसआय आयोजित ज्ञानयाग व ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी कारखाना खर्चाने पाठविले जाते. प्रति एकरी १०० ते ११० मेट्रिक टन ऊस उत्पादन घेणारे शेतकरी तसेच प्रति एकरी १११ व त्यापुढे ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्रक, सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात येते.

मोफत माती परीक्षण...
व्हीएसआय, मांजरी बुद्रुक उत्पादित मल्टी मायक्रोन्युट्रीयंट, मल्टीमॅक्रोन्युट्रीयंट, ह्युमिक ॲसिड, वसंत ऊर्जा, ईपीएन आदींचा पुरवठा केला जातो. जमिनीची उत्पादकता शाश्वत ठेऊन जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांच्या प्रमाणानुसार ऊस पिकाला रासायनिक खत देऊन कमी खर्चात जास्तीतजास्त उत्पादन घेण्यासाठी कारखान्यामार्फत मोफत माती परीक्षण करून दिले जाते.

व्हीएसआयमार्फत देण्यात येणाऱ्या ऊस भूषण पुरस्कारासाठी कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सहभाग नोंदविण्यात येतो. कारखान्याच्या पाच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ऊस उत्पादकांनी सर्व ऊस विकास योजनांचा लाभ घेऊन जास्तीतजास्त ऊस आपल्या कारखान्याकडे नोंद करून गाळपास द्यावा.
सत्यशील शेरकर, अध्यक्ष, श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com