उपाययोजनांसाठी ८० लाख मंजूर ः बेनके

उपाययोजनांसाठी ८० लाख मंजूर ः बेनके
Published on

जुन्नर, ता. ३० : ‘‘जुन्नर वनविभागातील बिबट्यांकडून होणाऱ्या हल्ल्यावरील उपाययोजनांच्या कामांसाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना २०२४- २५ अंतर्गत ८० लाख रुपयांचा निधी मंजूर केला, अशी माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.

ग्राम परिसर व आदिवासी विकासयोजनेअंतर्गत विविध कामांसाठी हा निधी मंजूर झाला आहे. आमदार बेनके म्हणाले, ‘‘जुन्नर वनविभागातील सर्व तालुक्यांत मानव बिबट संघर्ष मोठया प्रमाणात वाढला आहे. वनविभागात २००१ पासून बिबट्याने मानवी वस्तीत प्रवेश केला. बिबट्याकडून नागरिक तसेच शेतकऱ्यांच्या पाळीव पशुधनावर हल्ल्याच्या घटना घडू लागल्या. या घटना वाढत गेल्याने स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
जुन्नर वनविभागात २०२४ मध्ये बिबट्यांच्या हल्ल्यात अनेकजण गंभीर जखमी झाले, तसेच मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्याने जनक्षोभ उसळला असून मानवी जीवन धोक्यात आले आहे.’’

स्थानिक लोकांचा उद्रेकामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बिबट्यांचे माणसांवर हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने सदरचे क्षेत्र मानव - बिबट संघर्षाचे संवेदनशील आपत्ती क्षेत्र झाले आहे. वनविभागात बिबट हल्ला ही नित्याची बाब झाली आहे. ग्राम परिसर व आदिवासी विकास कार्यक्रमाअंतर्गत आवश्यक साहित्य खरेदीसाठी निधीची मागणी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. जिल्हा वार्षिक योजनेतून वनसंरक्षण कामासाठी वाहन खरेदीसाठी ३१ लाख ८३ हजार रुपये, १० ट्रॅप कॅमेऱ्यांसाठी तीन लाख १८ हजार ६०० रुपये, दहा सापळा पिंजऱ्यांसाठी २७ लाख ५० हजार रुपये, ६ भिंत पिंजऱ्यासाठी ४ लाख ८० हजार रुपये, नायलॉन दोरीसाठी ४८ हजार रुपये, थर्मल ड्रोनसाठी ९७ हजार ५०० रुपये आदी कामांना निधी मंजूर झाला असल्याचे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com