शिवजन्मस्थळी पारंपरिक पद्धतीने शिवजन्मोत्सव

शिवजन्मस्थळी पारंपरिक पद्धतीने शिवजन्मोत्सव

Published on

जुन्नर, ता. १९ : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५वी जयंती शासकीय परंपरेनुसार बुधवारी (ता. १९) किल्ले शिवनेरीवर उत्साहात साजरी करण्यात आली. गडावरील शिवजन्मस्थळी मंत्री महोदयांच्या उपस्थितीत फुलांनी सजविलेल्या पाळण्यात बाल शिवाजी राजांची मूर्ती ठेऊन पाळण्याची दोरी हलवून पाळणा गीत गाऊन पारंपरिक पद्धतीने शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठा सेवा संघाच्यावतीने रूपाली महाबरे, सुजाता बोचरे, रोषणा बुट्टे, दीक्षा शिंदे, सुरेखा जढर, स्वाती घोडे, दीक्षा शिंदे यांनी पाळणा म्हटला. तसेच, कविता जाधव, स्मिता धावले, प्रमिला भोर, पूनम माने,दर्शना मोढवे यांनी जिजाऊ वंदना म्हटली. त्यानंतर जन्मोत्सवानिमित्त सर्वांना सुंठवडा व प्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके, भाजप नेत्या आशा बुचके, विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, मराठा सेवा संघाचे पदाधिकारी विजय घोगरे, बाळासाहेब घुले, ॲड. राजेंद्र बुट्टे, गणेश महाबरे व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्रिमहोदयांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची विधीवत पूजा करून पालखीला खांदा दिला. पोलिस बँड पथकाने राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर करून मानवंदना दिली. पोलिस पथकाने बंदुकीच्या फैरींची सलामी दिली.
शिवकुंज येथील बाल शिवाजी व जिजाऊ मातेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शेकडो शिवभक्तांच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवराय,जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी शिवजन्मस्थळ परिसर दुमदुमून गेला होता. शिवजन्मस्थान पारंपारिक कार्यक्रमांनी गजबजून गेले होते.
अनेक बालचमू शिवरायांची वेशभूषा करून गडावर आले होते. दुर्गम आदिवासी भागातील मुथाळणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या ३० विद्यार्थ्यांच्या बाल पथकाने लेझीम खेळाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील वेगवेगळे प्रसंग सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. मुख्याध्यापिका कमल डुंबरे, शिक्षिका लक्ष्मण जोशी व संगीत हिरे यांनी संयोजन केले. साहसी खेळाची प्रात्यक्षिके देखील सादर करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com