

जुन्नर, ता. १० : जुन्नर (पुणे) व अकोले (अहिल्यानगर) तालुक्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या अतिदुर्गम व निसर्गरम्य फोफसंडी गावातील दोन आदिवासी विद्यार्थ्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण होत डॉक्टर पदवी संपादन केली आहे.
फोफसंडी गावातील पुष्पांजली वळे व ऋत्विक कोंडार यांनी गावातील पहिला डॉक्टर होण्याचा बहुमान मिळविला आहे. याबद्दल गावचे सरपंच, उपसरपंच ग्रामस्थांनी दोघांचे अभिनंदन केले आहे.
डॉ. पुष्पांजली ओतूर (ता. जुन्नर) येथील चैतन्य विद्यालयातील शिक्षक ज्ञानदेव वळे यांची कन्या होय. पुष्पांजलीने इयत्ता चौथीची शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता पाचवीला नवोदय परीक्षेत यश मिळविले होते. त्यांनतर नवोदय विद्यालयात शिक्षण घेतले. कोणत्याही खासगी क्लासशिवाय नीट परीक्षेत यश मिळवत तिने भाऊसाहेब हिरे गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेज, धुळे येथे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. सध्या धुळे येथे इंटर्नशिप करत असून आदिवासी भागातील जनतेसाठी सेवा करण्याचा तिचा संकल्प आहे.
डॉ. ऋत्विक कोंडार (ता. जुन्नर) येथील पुष्पावती विद्यालयातील शिक्षक मंगेश कोंडार यांचा मुलगा असून, त्याने इयत्ता पाचवीला नवोदय परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पिंपळे जगताप, पुणे येथील नवोदय विद्यालयात बारावीपर्यंत शिक्षण घेतले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथून एमबीबीएस शिक्षण पूर्ण केले आहे. दोन्ही कुटुंबे मूळची फोफसंडी (ता. अकोले) येथील आहेत. नोकरीच्या निमित्ताने जुन्नर तालुक्यात वास्तव्यास आहेत.
‘‘दोघांनी केवळ अभ्यास, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर यश मिळविले असून, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श घालून दिला आहे. फोफसंडी ग्रामस्थ, पंचक्रोशीतील नोकरदार तसेच ‘नक्षत्राचं देणं काव्य मंच, महाराष्ट्र राज्य’ आदिवासी बांधवांनी दोघांचे अभिनंदन केले आहे. फोफसंडी गावात आता शिक्षक, पोलिस, इंजिनिअर, कवी, लेखक तसेच डॉक्टरांचे उज्ज्वल भविष्य प्रेरणादायी आहे,’’ असे ग्रामस्थ कवी यशवंत घोडे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.