शिवनेरी संवर्धन, युनेस्कोचे मानांकन
जुन्नर, ता. २१ : छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला. यानिमित्त सेवानिवृत्त वनाधिकारी बी.टी. हगवणे यांनी ‘सकाळ’शी बोलताना जुन्या आठवणींना उजाळा दिला.
सुमारे २५ वर्षांपूर्वी जुन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून हगवणे यांनी काम केले आहे. त्यावेळी शिवनेरीवर येणाऱ्या नागरिक, पर्यटकांची संख्या आताच्या तुलनेत कमी होती. उपवनसंरक्षक म्हणून अशोककुमार खडसे यांनी पदभार घेतला होता. खडसे यांनी परिसरात येणाऱ्या पर्यटकांना आणखी कोणत्या सुविधा देता येतील याबाबतची आढावा बैठक घेतली होती. या वेळी किल्ले शिवनेरी दुरवस्थेत असल्याचे त्यांना जाणवले. काही दिवसांतच निवडक अधिकारी, गिर्यारोहण क्षेत्रात कार्यरत असणारे तरून आणि पत्रकारांसोबत शिवनेरीचा दौरा केला.
यावेळी शिवनेरीची झालेली दुरवस्था, पडझड, ओसाड पडलेल्या बागा असे चित्र होते. या दौऱ्यात खडसे यांनी यापूर्वी शिवनेरीवर काही काम झाले आहे का, विकास आराखडा तयार आहेत का, याची माहिती घेण्यास सांगितले. यानंतर काही दिवसांत सार्वजनिक बांधकाम विभाग, तहसीलदार कार्यालयांशी संपर्क साधून माहिती घेतली असता १९८१-८२ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीनिवास पाटील यांनी आराखडा केल्याची कागदपत्रे मिळून आली. मात्र, हा विकास आराखडा काही पुढे गेला नाही. यामुळे पुन्हा जुन्नर वन विभागाच्या वतीने समग्र विकासाचा आराखडा करण्याच्या सूचना खडसे यांनी दिल्या आणि त्यावर काम सुरू झाले. यात शिवजन्मभूमी संवर्धन समितीचे अध्यक्ष रवींद्र काजळे व सहकाऱ्यांची यांची साथ मिळाली.
वर्षभरात पुरातत्त्व विभाग, सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागाबरोबर बैठका घेऊन आराखडा तयार केला गेला. यासाठी भारतीय पुरातत्त्व विभागाच्या औरंगाबाद व दिल्ली येथील कार्यालयाशी खडसे यांनी भेटी देऊन वन आणि पुरातत्त्व विभागाचा समन्वय साधत विविध परवानग्या मिळविल्या. हा विकास आराखडा तत्कालीन जिल्हाधिकारी मधुकर कोकाटे यांना सादर केला. तसेच जिल्हा नियोजन समितीत विशेष लेखाशिर्ष तयार करून घेतले. १९ फेब्रुवारी २००३ साली तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शिवनेरी संवर्धन विकास प्रकल्पाचा शुभारंभाची घोषणा केली. पहिल्या टप्प्यासाठी १० कोटी रुपये जाहीर केले आणि प्रकल्प सुरू झाला.
शिवनेरीच्या संवर्धनात मोलाचा वाटा
विधानसभा अंदाज समितीचे अध्यक्ष प्रसाद तनपुरे यांच्या अध्यक्षतेखालील आमदारांचा दौरा शिवनेरीवर झाला. यात खडसे, साहाय्यक वनसंरक्षक रामकृष्ण आडकर आणि हगवणे सहभागी होते. वनविभागाने सादर केलेल्या आराखड्याचे सादरीकरण अंदाज समितीला केले. समितीने शिवनेरी किल्ल्याच्या संवर्धनाला निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन दिले आणि निधी अव्याहतपणे सुरू राहिला. यानंतर आतापर्यंत २०२५ पर्यंत हा प्रकल्प सुरू असून, तत्कालीन जिल्हाधिकारी प्रभाकर देशमुख तसेच खेडचे प्रातांधिकारी गजानन पाटील यांचे नंतरचे जिल्हाधिकारी, वनविभागाचे उपवनसंरक्षक, भारतीय पुरातत्त्व विभागाचे बी.बी. जंगले यांनी विशेष लक्ष देत शिवनेरी संवर्धन केल्याने युनेस्कोचे मानांकन मिळाले असल्याची भावना हगवणे यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.