जुन्नरला गणेश मूर्तींचे रंगकाम अंतिम टप्प्यात
जुन्नर, ता. २१ : अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी जुन्नर येथील कुंभारवाडा परिसरात गणेशमूर्ती बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कारखान्यांमध्ये गणेश मूर्तींवर रंगाचा शेवटचा हात फिरवण्यात कारागीर मग्न आहेत.
कारखान्यात तयार झालेल्या गणेशमूर्ती विक्रीसाठी पुणे, अहिल्यानगर, मुंबई, नाशिक आदी शहरात पाठविण्यासाठी कारखानदारांची लगबग सुरू आहे. यावर्षी येत्या ३१ ऑगस्टला गणेशोत्सवास सुरुवात होत आहे. महाराष्ट्राचा हा सांस्कृतिक सण असल्याने गणेशभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहावयास मिळतो. यावर्षीच्या उत्सवात एक ते १० फुटांपर्यंतच्या विविध आकारांच्या आकर्षक मूर्ती प्रमुख आकर्षण ठरणार आहेत. बहुतांश मूर्ती पूर्णत्वास आल्या असून, उर्वरित मूर्तींवर अंतिम रंगकाम आणि सजावटीचे काम सुरू आहे.
कुंभारआळी व शहरात यंदा सुमारे १५ ते २० गणेश मूर्तीचे कारखाने कार्यरत आहेत. सार्वजनिक गणेश मंडळे तसेच, घरगुती गणेश मूर्तीसाठी येथील कारागिरांकडे आगाऊ नोंदणी करत असतात. यामुळे सर्व कारागीर दिवस- रात्र काम करून मूर्ती परिपूर्ण करण्यासाठी झटत आहेत. आकर्षक रंगसंगती, नवनवीन डिझाईन्स आणि आधुनिक डेकोरेशन यामुळे यंदाच्या मूर्तींची शैली वेगळी ठरत आहे.
पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून गणेश भक्त शाडूच्या मूर्तीची चौकशी करत असल्याने यावर्षी शाडूच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती देखील बनविण्यात आल्या आहेत. त्यांना देखील चांगली मागणी आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (POP) मूर्तींना मे-जून महिन्यात परवानगी मिळाल्याने गेल्या काही दिवसांपासून लहान व मोठ्या आकाराच्या गणेशमूर्ती तयार करण्यासाठी कारागिरांना जास्त मजुरी देऊन कमी वेळात जास्तीत जास्त गणेशमूर्ती बनविण्याचे आव्हान प्रत्येक कारखानदारास होते. यासाठी पीओपीच्या गणेशमूर्ती बनविण्याचे काम रात्र- दिवस सुरू होते.
पेणच्या शाडूच्या मूर्ती, पुणेरी पॅटर्न व पेणच्या शाडू व प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या फेटाधारी जय मल्हार, हनुमान, बाल गणेश, तांडव अवतार, शिव अवतार अशा अनेक मूर्तींना घरगुती उत्सवासाठी विशेष मागणी असते. आकर्षक रंगसंगतीच्या मूर्तीला विशेष पसंती देण्यात येते. गणपती मूर्ती बनविण्याचे काम नियमित सुरू असते. परिसरातील नागरिक दोन ते तीन महिन्यांपासून ऑर्डर देत असतात. यात सार्वजनिक पीओपीच्या आकर्षक मूर्तींना मोठी मागणी आहे. पेण शहरातील आकर्षक मूर्ती, मुंबई पॅटर्न डिझाईन्स, बालगणपती, कार्टून डिझाईन्स तसेच, विविध प्राण्यांवर बसलेल्या मूर्ती यांचीही विक्री वाढली आहे.
किमतीत वाढ आणि साहित्याचा तुटवडा
यावर्षी रंग, सजावटीचे साहित्य आणि मूर्ती बनविण्याचे कच्चे साहित्य आदींचे दर प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे मूर्तींच्या किमतीत १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे सांगण्यात आले. किमतीत वाढ झाली असली तरी भाविकांचा उत्साह पूर्वीइतकाच आहे. आपल्या आवडत्या बाप्पाच्या मूर्तीची आगाऊ नोंदणी तसेच, खरेदीसाठी लगबग सुरू आहे.
कुंभारआळी येथे दररोज जुन्नर व परिसरातील गावांतील गणेशभक्त आपल्या आवडत्या गणपती बाप्पाची मूर्ती निश्चित करण्यासाठी गर्दी करत आहेत. आपली गणेशमूर्ती ग्राहकांच्या पसंतीस उतरल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून कारागिरांना आपल्या कलेचे कौतुक झाल्याचा आनंद मिळतो.
- बिभीषण जगदाळे, मोरया आर्ट्स, जुन्नर