आदिवासी भागातील शिवालयांना भाविकांची पसंती

आदिवासी भागातील शिवालयांना भाविकांची पसंती

Published on

दत्ता म्हसकर : सकाळ वृत्तसेवा
जुन्नर, ता.२ : ‘महादेव’ आदिवासींचे दैवत आहे .त्यामुळे प्रत्येक बारा कोसावर आदिवासी भागात महादेवाचे मंदिर पाहावयास मिळते. या प्राचीन मंदिराला पर्यटक आवर्जून भेट देतात निसर्गरम्य परिसर, वाहणारे धबधबे, हिरवाईने नटलेले डोंगर-दऱ्या पाहून मन प्रसन्न होते. यामुळे शिवालयांत श्रावणासह महाशिवरात्रीला परिसरातील भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी असते.


अनेक महादेवाच्या मंदिरातील पूजेचा मान हा आदिवासी समाजाला दिला जातो. आदिवासी भागातील ही शिवालये भक्तीची प्रतीक म्हणून ओळखली जातात. आदिवासी भागातील केळी-माणकेश्वर, आंबोली-मिनेश्वर ही प्राचीन शिवालय प्रसिद्ध आहेत.

आंबोलीचे मिनेश्वर देवस्थान
ऐतिहासिक दाऱ्याघाटाच्या पायथ्याशी असलेल्या आंबोली येथे प्राचीन मिनेश्वर देवस्थान असून येथून मीना नदीचा उगम झाला आहे. मंदिरात स्वयंभू शिवलिंग व नंदीची प्राचीन मूर्ती आहे.नवसाला पावणारे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते.येथील गोमुखातून वर्षभर मीना नदीचे पाणी खळखळत वाहते. परिसरातील लोकवस्तीला बाराही महिने पाणी उपलब्ध असते.

माणकेश्वर शिवालय एक श्रद्धास्थान
केळी-माणकेश्वर येथे प्राचीन माणकेश्वर शिवालय आहे. माणिकडोह धरणाच्या जलाशयात गेलेल्या मंदिराचे ग्रामस्थांनी स्थलांतर केले आहे. धरणातील पाण्याच्या सततच्या संपर्कामुळे मंदिराचे नुकसान झाले होते. माणकेश्वर ग्रामस्थांनी श्रद्धेचे प्रतीक असलेले मंदिर स्थलांतरित केले. मंदिरातील शिवलिंग, नंदी आणि इतर महत्त्वाचे अवशेष सुरक्षितपणे काढून गावातील धरणाच्या किनारी आणले.तेथे तात्पुरत्या स्वरूपात शिवलिंग आणि नंदीची स्थापना करण्यात आली.दोन वर्षांनंतर येथे मंदिराचे बांधकाम करण्यात आले. आज हेच नवीन माणकेश्वर मंदिर भक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे.

नवीन बांधलेल्या माणकेश्वर मंदिराच्या परिसरात आजही जुन्या मंदिराचे काही अवशेष पाहण्यास मिळतात.हे अवशेष जुन्या ऐतिहासिक मंदिराची आणि ग्रामस्थांच्या भक्तीची साक्ष देतात. प्राचीन अवशेषांवरून स्थापत्यशैलीची माहिती मिळते.
माणकेश्वर मंदिराचा इतिहास केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक आणि ऐतिहासिक दृष्ट्याही महत्त्वाचा आहे. पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी स्थलांतरित मंदिराबाबत अधिक संशोधन केल्यास माणकेश्वर गावच्या प्राचीन इतिहास व संस्कृतीवर प्रकाश पडण्यास मदत होईल, असे ग्रामस्थांनी सांगितले.

08872, 08873

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com