जुन्नरला भात लागवड अंतिम टप्प्यात
जुन्नर, ता. ८ : जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागात भातरोपांची लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या आठवड्यात भात लागवड पूर्ण होईल अशी माहिती तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांनी दिली.
आदिवासी भागातील भात हेच खरीप हंगामातील मुख्य पीक आहे.तालुक्यात भाताचे सरासरी ११ हजार १२९ हेक्टर क्षेत्र असून यापैकी ९ हजार ०८६ हेक्टर क्षेत्रात भाताची पुनर्लागवड झाली आहे. भात पिकाची सुमारे ८२ टक्के पुनर्लागवड झाली आहे.
यंदा मे महिन्यात जवळपास तीन आठवडे पाऊस झाला. या पावसामुळे भात पेरणीची तसेच शेती मशागतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना पुरेसा वेळ मिळाला नाही. रोहिणी नक्षत्र ते मृग नक्षत्राच्या दरम्यान धुळवाफेवरची पेरणी करतात. यावर्षी अशी पेरणी करण्यासाठी धूळ वाफच उपलब्ध झाली नाही.मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर पावसाने थोडीफार उघडीप दिली.या काळात काही शेतकऱ्यांनी भात पेरणीला सुरुवात केली.सध्या भात लागवड अंतिम टप्प्यात आली आहे.
खरीप हंगामात पाऊस लवकर सुरू झाल्याने भात रोपाच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांनी चारसूत्री लागवडीला प्राधान्य दिले. शेतकऱ्यांनी दोन ते तीन भातरोपे एका चुडात लावून लावणी केल्याचे उपकृषी अधिकारी भारती मडके यांनी सांगितले.
भात उत्पादक शेतकऱ्यांचा आधुनिक पद्धतीने भात लागवडीकडे कल वाढला आहे. तालुक्यात चारसूत्री पद्धतीने सुमारे ४ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर,१० हेक्टरवर एसआरटी पद्धतीने व अभिनव पट्टा पद्धतीने सुमारे ५० हेक्टर क्षेत्रावर लागवड होते.भातशेतीत यांत्रिकरणाचा वापर होत आहे.
- गणेश भोसले, तालुका कृषी अधिकारी
08942