इस्रो भेटीसाठी जुन्नरच्या आदिवासी भागातील दोन विद्यार्थी
जुन्नर, ता. २२ : जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील दोन विद्यार्थ्यांची बंगळूर येथील भारतीय अवकाश संशोधन संस्थेस (इस्रो) भेट देण्यासाठी निवड झाली आहे. तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या सात विद्यार्थ्यांना ही संधी मिळाली आहे. यात ठाकरवाडी-तेजुर शाळेतील प्रणव कडाळे व राजूर नंबर एक शाळेतील श्रावणी सुपे दोघे इयत्ता सातवीमधील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
प्रणव हा जिल्ह्यातील आदिवासी ठाकर समाजाचा एकमेव विद्यार्थी आहे. प्रणव सहा महिन्याचा असताना वडिलांचा एका अपघातात मृत्यू झाला. तो आपल्या आजोळी राहत असून आई मोलमजुरी करते. पहिलीपासून हुशार असणारा प्रणव पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत आला होता. कडाळे भूमिहीन कुटुंब असून सरकारी घरकुलात राहत असल्याचे मार्गदर्शक शिक्षक सचिन नांगरे व मुख्याध्यापक तान्हाजी तळपे यांनी सांगितले.
श्रावणी सुपे हीचे मातृछत्र हरपले असून वडील कंपनी कामगार आहेत. आजी व आजोबा तिचा सांभाळ करतात.घरची खूप गरीबीची परिस्थिती आहे अशी माहिती मुख्याध्यापक बाळासाहेब मोरे यांनी दिली.
गटशिक्षणाधिकारी अशोक लांडे यांनी दोघांचे विशेष अभिनंदन केले आहे.