सह्याद्रीच्या रानकुशीत बहरला वावडींगचा हंगाम
जुन्नर, ता. ३ : सह्याद्रीच्या रानकुशीत जुन्नर, आंबेगाव व अकोले तालुक्यात सध्या वावडींगच्या फळांचा हंगाम सुरू झाला आहे. नैसर्गिक देणगी असलेली वावडींग संजीवनी म्हणून ओळखली जाते. आदिवासी बांधव आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकरच्या जंगलात, जुन्नरला दौंडया डोंगर परिसरात तसेच अकोले तालुक्यात रतनगड परिसरात असलेल्या दाट जंगलातून वावडींगची फळे गोळा करण्यात मग्न आहेत.
सर्वसाधारण एक मनुष्य दिवसभरात चार ते पाच किलो फळे गोळा करतो नंतर ही फळे वाळविण्यात येतात. फळे वाळण्यास पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी लागतो. फळांच्या उपलब्धतेनुसार एक व्यक्ती दिवसभरात पाच किलो फळे गोळा करते. स्थानिक आदिवासी भाषेत वावडिंगाला एडींग असेही म्हणतात.
पाच किलो फळे वाळविल्यास एक किलो वावडींग फळे तयार होतात. त्यातून दिवसाला पाचशे ते हजार रुपये रोज मिळू शकतो. ही फळे ओली असताना वजनदार असतात, मात्र, वाळल्यानंतर ती आकाराने लहान व वजनाने हलकी होतात.
दृष्टिक्षेपात वावडींग
१. झुडूपवर्गीय वनस्पती
२. पाने अंडाकृती, फुलांचा रंग सफेद
३. मिरीच्या आकारा एवढे फळ
४. फळास तांबूस रंग.
५. वाळल्यावर रंग होता काळा.
६. फळाचा गर भुरकट लाल रंग
७. आयुर्वेदिक औषधांमध्ये फळाचा वापर
५०० ते १,००० रुपये..............वाळलेल्या फळांना मिळणार बाजारभाव
वावडींग दुर्मीळ रानफळ आहे. रंगाने लाल, गुलाबी, चवीला आंबट, गोड असते. वावडींग वनस्पती मानवजातीला निसर्गाने दिलेली अमूल्य देणगी आहे. शास्त्रीय भाषेत ''एमबेलिया रिब्स ''नावाने ओळखले जाते. आयुर्वेदातील ही सर्वात शक्तिशाली औषधी वनस्पती व सात्त्विक जंतुनाशक वनस्पती आहे. वावडींग हे बियांच्या स्वरुपात वापरले जाते.
- तानाजी तळपे, रानभाजा अभ्यासक, सचिव, आदिवासी समाज प्रबोधिनी
वावडींग सह्याद्रीतील आदिवासी समाजासाठी संजीवनी आहे. नव्या पिढीला मात्र याची ओळख नसल्याची खंत आहे.
- बाळू निंबा लांडे, वावडींग उत्पादक, फांगुळगव्हाण (ता.जुन्नर)
वावडिंगमधील गुणधर्म
कटू, उष्ण, रूक्ष, शूल, कृमिघ्न, कफनाशक, वातनाशक
यावर गुणकारी
पोटात जंत झाल्यास, दमा, खोकला, बध्दकोष्ठता, प्रमेहरोगात, अपचन, मळमळ,पोट फुगणे तसेच अर्धांगवायू, वातविकार होऊ नये यासाठी वावडींग औषधी म्हणून उपयोग केला जातो.
09099, 09100, 09101