पुणे
मारहाणप्रकरणी सात जणांवर गुन्हा
जुन्नर, ता. ५ : येथील किरण चंद्रकांत विधाटे (रा. खालचा माळीवाडा, जुन्नर) यांना मारहाण करून जखमी केल्याच्या कारणावरून पोलिसांनी सात जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. संदीप रामदास डोके, अनिता संदीप डोके, प्रणव संदीप डोके, मधुरा किरण विधाटे (सर्व रा. कुमशेत), तसेच नीलेश शिंदे (रा. उदापूर, ता. जुन्नर) व अन्य अज्ञात दोघे अशी आरोपींची नावे आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली. किरण व त्यांची पत्नी मधुरा यांच्यात झालेल्या भांडणाच्या कारणावरून बुधवारी (ता. ३) सायंकाळी आरोपींनी किरण यांच्या घरात घुसून त्यांना शिवीगाळ करत, लोखंडी सळई व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केल्याचे, फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिस हवालदार काळे पुढील तपास करत आहेत.