बोरी बुद्रूक राज्यातील पहिले गाव

बोरी बुद्रूक राज्यातील पहिले गाव

Published on

जुन्नर/आळेफाटा, ता.१७ : रस्त्यांच्या सीमांकन नोंदी पूर्ण करणारे बोरी बुद्रूक (ता.जुन्नर) हे राज्यातील पहिले गाव ठरले आहे. येथील मूळचे पाच आणि शिवारफेरीद्वारे नव्याने निश्चित केलेले ६९ रस्ते अशा ७४ रस्त्यांच्या गाव नकाशावरील (जीआयएस)भौगोलिक माहिती प्रणाली नोंदी पूर्णत्वास आल्या आहेत.
गावकुसापासून शिवाराच्या पायवाटांपर्यंत आणि शेत शिवाराला जोडणाऱ्या पाणंद मार्गांपर्यंत प्रत्येक रस्त्याला आता कायदेशीर ओळख मिळणार आहे. राज्य सरकारच्या २९ ऑगस्टच्या शासन निर्णयानुसार जुन्नर तालुक्यातील सर्व रस्त्यांची नोंद घेऊन त्यांना भू-सांकेतिक क्रमांक देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ग्रामीण भागातील लाखो शेतकरी बांधवांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंध असलेला हा विषय असल्याने या उपक्रमाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. लोकसहभागातून काढलेल्या शिवार फेरीच्या माध्यमातून या उपक्रमाचा पहिला प्रयोग जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रूक येथे यशस्वीरीत्या पार पडला. गावातील एकूण ७४ रस्त्यांना भू-सांकेतिक क्रमांक देऊन त्यांची ग्रामसभेत मंजुरी घेण्यात आली.त्यानंतर महसूल व भूमिअभिलेख विभागाच्या संयुक्त पथकाने या सर्व रस्त्यांचे सीमांकन करून जीआयएस प्रणालीद्वारे नकाशावर नोंद केली आहे. यामुळे बोरी बुद्रूक राज्यातील रस्त्यांना सांकेतांक देवून जीआयएस नकाशावर स्थान देणारे पहिले गाव ठरले आहे. राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या या योजनेची अंमलबजावणी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम होत आहे. तहसीलदार डॉ.सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली ३ सप्टेंबरला झालेल्या तालुका समितीच्या बैठकीत महसूल सप्ताह (१७ सप्टेंबर ते २ऑक्टोबर) आयोजित करण्याचे ठरविण्यात आले. पहिल्या टप्प्यात १७ ते २२ सप्टेंबर दरम्यान ‘पाणंद रस्ता सप्ताह’ राबविण्यात येणार आहे.

काय नोंदवले जाणार
या प्रक्रियेत गावनकाशांवर असलेले व प्रत्यक्षात अस्तित्वात असलेले सर्व प्रकारचे रस्ते नोंदवले जाणार आहेत. यात ग्रामीण रस्ते, हद्दीचे रस्ते, पायमार्ग, शेतरस्ते, वहिवाटीचे रस्ते यांचा समावेश असेल. रस्त्याची लांबी, रुंदी, सुरवात-शेवट, किती शेतकरी त्याचा वापर करतात, कोणत्या गटातून रस्ता जातो याचा तपशील भरणे बंधनकारक असेल. ग्रामसभेची मंजुरी अनिवार्य संकलित केलेली माहिती १७सप्टेंबरपासून प्रत्येक गावातील ग्रामसभेत ठेवली जाणार असून ग्रामसभेची मंजुरी घेणे अनिवार्य असेल.अतिक्रमित वा बंद रस्त्यांबाबत मंडळ स्तरावर रस्ता समितीच्या उपस्थितीत ‘रस्ता अदालत’घेऊन निर्णय दिला जाणार आहे.

जीआयएस प्रणालीद्वारे नकाशावर नोंदणी
ग्रामसभेत मंजूर रस्त्यांना भू-सांकेतिक क्रमांक देऊन उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयास माहिती पुरवली जाईल. त्यानंतर जीआयएस प्रणालीद्वारे नकाशावर अक्षांश-रेखांशासह नोंदणी होईल. यामुळे रस्त्यांना अधिकृत व कायदेशीर अभिलेख प्राप्त होईल.

“ग्रामस्थांनी महसूल सप्ताहात सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या गावातील पाणंद, शेतरस्ते व शिवरस्त्यांची नोंद करून ग्रामसभेत मंजुरी घ्यावी.शासनाच्या या महत्त्वाच्या उपक्रमाला सहकार्य करून भविष्यातील कायदेशीर अभिलेखासाठी सर्वांनी एकत्र यावे.”
- डॉ. सुनील शेळके, तहसीलदार

7027

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com