नागरिकांनी आपली जमीन, पाणी वाचवावे
खळद, ता. १३ : ‘‘नदीवर दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत आहे. नदीत पाणी कमी आणि गाळ जास्त होत आहे. शहराचा मैला नदीत येत आहे, दुर्गंधी वाढत आहे, भूजल बरबाद होत आहे, बोअरवेलची संख्या वाढत आहे. पाणी आणि जंगल याचे नियोजन महत्त्वाचे असून संपूर्ण पाणी अडवू नये. गावच्या लोकांनी जमीन, पाणी, दगड, माती वाचवली पाहिजे. यासाठी उच्च शिक्षण झाल्यावर मुलांनी एक एक गाव निवडून गावोगावी हा संदेश द्यावा.’’ असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या, जलआंदोलनाच्या राष्ट्रीय नेत्या मेधा पाटकर यांनी केले.
खळद (ता. पुरंदर) येथे पाणी पंचायतीमध्ये ग्रामगौरव प्रतिष्ठान पाणीपंचायत आणि एमआयटी विश्वशांती विद्यापीठ यांच्या वतीने आयोजित ग्रामीण तादात्म्य कार्यक्रमात ‘नदी संवर्धन आवश्यकता आणि लोकांचा सहभाग’ या विषयावर मेधा पाटकर बोलत होत्या. एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष राहुल कराड यांच्या संकल्पनेतून ‘ग्रामीण तादात्म्य कार्यक्रम’ राबविला होता.
या वेळी ग्रामगौरव प्रतिष्ठानच्या संचालिका सोनाली शिंदे, प्रसाद सेवेकरी, प्रा. डॉ. अनिल माशेलकर, प्रा. डॉ. चिदानंद कोष्टी, प्रा. डॉ. वैभव कुलकर्णी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अविनाश जाधव, ग्रामीण तादात्म्य कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. डॉ. अजित देवरे, डॉ. गौरव नारखेडे, प्रा. नवनाथ शेटे, डॉ. प्रशांत पाटणे, डॉ. चेतन पाटील यांचे सहकार्य मिळाले.
पाटकर म्हणाल्या, ‘‘नदी संवर्धन हा विषय आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाचा आणि चर्चेचा आहे. नद्या म्हणजे आपले जीवन, त्या केवळ पाण्याचा स्रोत नसून सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणीय महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. नदी संवर्धनासाठी पाण्याचा स्रोत, जैवविविधता, पर्यावरणीय स्थिरता हे मुद्दे लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. नर्मदा आंदोलनातून मिळालेला अनुभव मला हे शिकवतो की, लोकांच्या हक्कांसाठी आणि निसर्गाच्या संरक्षणासाठी आपण आवाज उठवायला हवा.’’ सूत्रसंचालन प्रशांत बोरावके यांनी तर सोनाली शिंदे यांनी आभार मानले.
संविधान दिवस हा फक्त साजरा करून चालणार नाही. तर संविधान सर्वांना समजलं पाहिजे. संविधानाने आपल्याला दिलेला हक्क, व्यक्ती स्वातंत्र्य, आपला अधिकार आपल्याला समजला पाहिजे, जल-जंगल-जमीन आपली आहे, कोणाची जहागिरी नाही. यासाठी प्रत्येकाने आपले मत ग्रामसभेत नोंदवत ग्रामसभा सशक्त केली पाहिजे.
मेधा पाटकर, सामाजिक कार्यकर्त्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

