लढत तिरंगी होणार की चौरंगी
लढत तिरंगी होणार की चौरंगी
नेत्यांच्या पक्षप्रवेशाने पुरंदर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. प्रमुख राजकीय पक्षांची ताकद तुल्यबळ असल्यामुळे आणि युती आणि आघाडीची शक्यता धूसर असल्यामुळे पंचायत समिती निवडणुकीची लढत तिरंगी होणार की चौरंगी, याची उत्सुकता आहे. मागील निवडणुकीतील आकडेवारी आणि सद्यःस्थितीतील पक्षीय बलाबल पाहता येणाऱ्या निवडणुकीत काट्याची टक्कर होण्याची शक्यता आहे.
- योगेश कामथे, खळद
पुरंदर तालुक्यात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षातून माजी आमदार संजय जगताप यांचे पक्षांतर, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये व शिवसेनेतील फुटीमुळे आघाडी थोडी कमकुवत झाल्याचे दिसत आहे. असे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. विधानसभेला दुरावलेले अनेक चेहरे पुन्हा पक्षात दिसत आहेत. युगेंद्र पवार यांनी तालुक्यात लक्ष घातल्याने कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसत आहे. मात्र, युती किंवा आघाडी होते, की सर्व पक्ष स्वबळावर लढणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. येथे युतीची शक्यता धूसर असून, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेना कोण कोणासोबत जाणार, याबाबतही चर्चा रंगत आहे.
मागील निवडणूक २०१७ मध्ये झाली होती. त्यावेळी शिवसेनेचे विजय शिवतारे हे आमदार व राज्यमंत्री होते. याचाही मोठा फायदा त्यावेळी शिवसेनेच्या उमेदवारांना होऊन पुरंदर पंचायत समितीवर प्रथमच भगवा फडकला होता. आताही विजय शिवतारे आमदार आहेत. शिवसेना फुटीचा पुरंदरमध्ये फारसा परिणाम झाला नाही. बहुतांश महत्त्वाचे कार्यकर्ते व मागील बहुतेक सदस्य शिवसेनेत (शिंदे) आहेत.
माजी आमदार संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने तालुक्यात भाजपची ताकद प्रचंड वाढली आहे. त्याचबरोबर माजी आमदार अशोक टेकवडे, भाजपचे पुरंदर हवेली विधानसभा अध्यक्ष बाबा जाधवराव आणि माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम जगदाळे हेदेखील भाजपमध्ये सक्रिय आहेत. त्यामुळे आता ही निवडणूक शिवसेनेला फारशी सोपी राहिलेली नाही.
मागील निवडणुकीतील स्थिती
पुरंदर पंचायत समितीच्या मागील निवडणुकीत आठपैकी सहा सदस्य शिवसेनेचे आणि दोन सदस्य काँग्रेसचे निवडून आले होते.
गराडे- दिवे, भिवडी- वीर, कोळविहिरे- नीरा शिवतक्रार हे तीन जिल्हा परिषद गट आणि त्याअंतर्गत येणारे सहा पंचायत समिती सदस्य शिवसेनेकडे होते. हे सर्व जिल्हा परिषद आणि बहुतांश पंचायत समिती सदस्य आजही आमदार विजय शिवतारे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत (शिंदे) कार्यरत आहेत. तर, माळशिरस- बेलसर जिल्हा परिषद गट आणि त्यातील दोन्ही पंचायत समिती सदस्य काँग्रेसकडे होते. त्यातील काँग्रेसचे बेलसर- माळशिरस गटाचे जिल्हा परिषद सदस्य आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार)गेले आहेत, तर या गटातील काँग्रेसचे दोन्ही पंचायत समिती सदस्य मात्र माजी आमदार संजय जगताप यांच्यासोबत भाजपात सामील झाले आहेत.
तालुक्यातील समस्या
- माळशिरस, बेलसर, कोळविहिरे, दिवे या गणातील बहुतेक भागाला पुरंदर उपसा, तसेच माळशिरस गणातील पाच गावांत जनाई उपसा सिंचन योजनेचे लाभार्थी आहेत. या योजनांतील अनियमितता.
- बेलसर, दिवे गणात होऊ घातलेल्या विमानतळाबाबत शेतकऱ्यांची नाराजी.
- जलजीवन योजनांची अर्धवट अवस्थेतील कामे.
- सर्व प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद असल्याने उन्हाळ्यात नागरिक, तसेच जनावरांना शासनाच्या पाणी टँकरची वाट पाहायला लागते.
- अद्याप न आलेले गुंजवणीचे पाणी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

