महिलांच्या सर्वांगीण विकासाची ‘उमेद’

महिलांच्या सर्वांगीण विकासाची ‘उमेद’

Published on

योगेश कामथे, खळद

शासनाच्या ग्रामविकास विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरुवात २०१९ मध्ये करण्यात आली. ग्रामीण भागातील गरीब आणि जोखीम प्रवण कुटुंबांना आत्मसन्मानाने, सुरक्षित आणि समृद्ध जीवन जगता यावे यासाठी सर्वसमावेशक व लोकशाही तत्त्वांवर आधारित स्वयंचलित समुदाय संस्थांची निर्मिती करणे, त्यांना हक्क, अधिकार, वित्तीय सेवा आणि शाश्‍वत उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

या अभियानाचे मिशन म्हणजे ग्रामीण आणि गरीब कुटुंबांसाठी पोषक वातावरण निर्माण करणारी समर्पित व संवेदनशील संस्था उभारणे आहे. तर व्हीजन समन्यायी, लिंगसमभावाचे मूल्य जपणाऱ्या प्रगतशील राज्याची निर्मिती करणे हे आहे. जिथे प्रत्येक नागरिक सन्मानाचे आणि संपन्नतेचे जीवन जगू शकेल.

पुरंदर तालुक्यात उल्लेखनीय कामगिरी
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात उमेद अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर काम करण्यात आले आहे. २०१९ पासून आजपर्यंत तालुक्यात एकूण १५७४ महिला स्वयंसहाय्यता समूह (महिला बचत गट) स्थापन करण्यात आले आहेत. त्यामध्ये १५,९८४ महिला सदस्य सक्रिय आहेत. महिला स्वयंसहाय्यता समुहांच्या संघटनांसाठी तालुक्यात ९३ ग्रामसंघ स्थापन केले असून, जिल्हा परिषद गटनिहाय ४ प्रभागसंघ कार्यरत आहेत. ग्रामसंघांच्या कामासाठी शासनाकडून ५५ हजार रुपयांचे स्टार्टअप अनुदान देण्यात येते. त्यानुसार पुरंदर तालुक्यातील ८१ ग्रामसंघांना हा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, यातील २८ ग्रामसंघांना दुसरा हप्ता मिळालेला आहे. तसेच १६ ग्रामसंघांना जोखीम प्रवणता निधी (VRF) देण्यात आला आहे.

आर्थिक सक्षमतेकडे महिलांची वाटचाल -
ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून खेळते भांडवल, बँक कर्ज, समुदाय गुंतवणूक निधी (CIF) अशा विविध आर्थिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पुरंदर तालुक्यातील १५२७ महिला स्वयंसहाय्यता समूहांना प्रत्येकी ३० हजार रुपयांचे खेळते भांडवल देण्यात आले आहे. याशिवाय ११२३ गटांना सीआयएफ निधी, तर १२५६ महिला स्वयंसहाय्यता समूहांना बँक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. महिला बचत गट एक लाखापासून ते वीस लाख रुपयांपर्यंत बँक कर्ज घेत असून, त्या नियमित व शिस्तबद्ध परतफेड करत आहेत, हे या अभियानाच्या यशाचे द्योतक आहे.

शेती व बिगर शेती व्यवसायात वाढल्या महिला -
महिला स्वयंसहाय्यता समूहातील महिला शेतीपूरक व्यवसायांसोबतच विविध बिगर शेती आधारित उद्योगांमध्ये सक्रिय आहेत. शेतीबरोबर कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर महिलांकडून केला जात आहे. तसेच तालुक्यातील ३३७२ महिला बिगर शेती आधारित व्यवसाय करत आहेत. यामध्ये किराणा दुकान, पिठाची गिरणी, अन्नपदार्थ निर्मिती, ब्युटी पार्लर, अगरबत्ती निर्मिती, कपड्यांचे आणि सौंदर्यप्रसाधनांचे दुकान, फळे व भाजीपाला विक्री, हस्तकला, बेकरी उद्योग, मसाले व लोणचे निर्मिती, चप्पल तयार करणे, स्टेशनरी व झेरॉक्स सेंटर यांसारख्या विविध उद्योगांचा समावेश आहे.

लखपती दीदींची संख्या -
उमेद अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे पुरंदर तालुक्यातील ९७६८ महिला ‘लखपती दीदी’ झाल्या असून, आर्थिक स्वावलंबनाकडे महिलांची भक्कम वाटचाल सुरू आहे.

ग्रामसखींची भूमिका महत्त्वाची -
पूर्वी समुदाय संसाधन व्यक्ती (ICRP) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समुदाय संसाधन व्यक्तींचे नाव ‘ग्रामसखी’ असे बदलण्यात आले आहे. महिला स्वयंसहाय्यता समूहांचे काम प्रभावीपणे चालविण्यासाठी पुरंदर तालुक्यात एकूण ८० ग्रामसखी

कार्यरत आहेत.

स्मार्ट प्रकल्पांतर्गत महिला उत्पादक कंपनी -
पुरंदर तालुक्यात माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (SMART) अंतर्गत ५०३ महिलांची ‘किल्ले पुरंदर महिला शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड’ स्थापन करण्यात आली आहे. ही कंपनी वीर भिवडी जिल्हा परिषद गटातील स्वराज्य प्रभागसंघात स्थापन झाली असून, भविष्यात महिला राइस मिल उभारून तांदळाचे पॅकेजिंग, ब्रँडिंग व निर्यात करणार आहेत. उमेद अभियानाला जोडलेल्या महिला पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून महिला गटशेतीही करू लागल्या आहेत.

कौशल्य विकास प्रशिक्षणामुळे संधी
महिलांच्या कौशल्य विकासासाठी RSETI, माणदेशी फाउंडेशन, ग्रामपंचायत १५ वा वित्त आयोग यांच्या माध्यमातून विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आले आहेत. ४९ गावांमध्ये मसाले, लोणचे बनविणे, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, आरी वर्क, पेहराव व दागिने बनविणे, फास्टफूड निर्मिती, भाजीपाला पॅकेजिंग आदी विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले आहे.

ग्रामीण विकासाचा नवा आदर्श -
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामुळे पुरंदर तालुक्यात ग्रामीण महिलांचा सामाजिक, आर्थिक व उद्योजकीय विकास साधला जात असून, महिला स्वयंसहाय्यता समूहांच्या माध्यमातून स्वावलंबी, सक्षम व आत्मनिर्भर ग्रामीण समाजाची निर्मिती होत आहे. हा उपक्रम ग्रामीण विकासाचा एक आदर्श ठरत आहे.

पानवडीतील ग्रामसंघाने प्रधानमंत्री कार्यालयाशी थेट पत्रव्यवहार करून मोबाईल नेटवर्कचा प्रश्‍न सोडवला. कोरोना काळात गरीब महिलांना अन्नधान्य वाटप व मास्क उत्पादन-विक्री केली, तर मनीषा कामथे यांनी शून्यातून सुरुवात करत आज ५० लाखांची उलाढाल करणारी आणि दिल्लीपर्यंत आपला माल पोहोचविणारी यशस्वी उद्योजिका म्हणून ओळख निर्माण केली.
- नंदा कुर्डे, तालुका अभियान व्यवस्थापक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com